Loksabha 2019 : मतदारसंघांत निवडणूक धूम

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 April 2019

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातील शेवटच्या रविवारी (ता. २१) सर्व उमेदवारांनी मतदारसंघ पिंजून काढले. सकाळपासूनच दुचाकी फेऱ्या आणि पदयात्रा निघाल्या होत्या. विशेष म्हणजे मनसेने भाजप-शिवसेना युतीच्या विरोधातील तोफमारा सुरूच ठेवला.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातील शेवटच्या रविवारी (ता. २१) सर्व उमेदवारांनी मतदारसंघ पिंजून काढले. सकाळपासूनच दुचाकी फेऱ्या आणि पदयात्रा निघाल्या होत्या. विशेष म्हणजे मनसेने भाजप-शिवसेना युतीच्या विरोधातील तोफमारा सुरूच ठेवला.

मुंबईत पुढील सोमवारी (ता. २९) मतदान होणार आहे. त्यामुळे आदल्या दिवशी रविवारी रस्त्यावर प्रचार करता येणार नाही. म्हणून प्रचारातील शेवटच्या रविवारी सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांप्रमाणे अपक्षांनीही दणकून प्रचार केला. कार्यकर्त्यांनी बाईक रॅली, प्रचारफेऱ्या काढून शक्तिप्रदर्शन केले. उमेदवार प्रमुख रस्त्यांवरून फिरत असताना स्थानिक पदाधिकाऱ्यांवर गल्लीबोळांमधील प्रचाराची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण मुंबई प्रचारमय झाली होती.

दक्षिण-मध्य मुंबईतील काँग्रेस उमेदवार एकनाथ गायकवाड यांच्या प्रचारात मनसेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या बाईक रॅलीतही मनसे कार्यकर्त्यांनी भाग घेतला. वायव्य मुंबईतील शिवसेना उमेदवार गजानन कीर्तिकर यांनी जुहू चौपाटीवर मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दक्षिण मुंबईतील उमेदवार अरविंद सावंत यांच्या प्रचारासाठी परळ येथील मैदानात उतरून क्रिकेटचा डाव मांडला.

मनसेचे ट्विटास्त्र
भाजपच्या भोपाळमधील उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी हुतात्मा हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शिवसेना-भाजपची मुंबईत चांगलीच कोंडी झाली आहे. मनसेने हुतात्मा मराठी पोलिस अधिकाऱ्याचा मुद्दा ट्‌विटरपासून रस्त्यावरील प्रचारातून मतदारांपर्यंत पोहोचवला. मनसेचे नेते संदीप देशपांडे व अमेय खोपकर यांनी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याचा ट्विटरवरून समाचार घेतला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी हा मुद्दा लावून धरला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: last Sunday of the campaign