Loksabha 2019 : लक्ष्मी हेब्बाळकर यांना दिल्लीचे निमंत्रण

Loksabha 2019 : लक्ष्मी हेब्बाळकर यांना  दिल्लीचे निमंत्रण

बंगळूर - बेळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निवडीचा पेच अद्याप सुटलेला नाही. बेळगावातून सर्वसंमत उमेदवार देण्याच्या दृष्टीने माजी मुख्यमंत्री व विधिमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामय्या यांनी जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांशी गुरुवारी (ता. १४) चर्चा केली. दरम्यान, बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना काँग्रेस हायकमांडने दिल्लीला येण्याचे निमंत्रण दिल्याने उमेदवारीबद्दल नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

मंत्री सतीश जारकीहोळी, बेळगाव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व जिल्ह्यातील पक्षाचे आमदार व इतर प्रमुख नेते बंगळूरमधील बैठकीला उपस्थित होते. भाजपचे विद्यमान खासदार सुरेश अंगडी यांचा पराभव करून भाजपची विजयी परंपरा खंडित करण्यासाठी बेळगाव लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस प्रभावी उमेदवाराच्या शोधात आहे.

बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आपले बंधू चन्नराज हेब्बाळकर यांना उमेदवारी देण्यासाठी पक्षनेत्यांवर दबाव आणत आहेत. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधात असलेले जारकीहोळी बंधू त्याला जोरदार विरोध करीत आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत लक्ष्मी हेब्बाळकर यांनी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांचा ७५,८६० मतांनी पराभव झाला होता. यावेळी पुन्हा त्यांनीच निवडणूक लढविल्यास काँग्रेसला विजय मिळू शकेल, असा पक्षनेत्यांचा होरा आहे. यासाठी त्यांनीच पुन्हा एकदा लोकसभेची निवडणूक लढवावी, असा नेत्यांचा आग्रह आहे.

सिध्दरामय्या यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बेळगाव जिल्ह्यातील नेत्यांच्या बैठकीत संभाव्य उमेदवारावर चर्चा करण्यात आली. सर्वांची मते आजमावून घेऊन सर्वसंमत उमेदवार देण्याचा नेत्यांनी प्रयत्न केला आहे. पक्षश्रेष्ठी ज्या उमेदवाराची निवड करतील त्याच्या विजयासाठी सर्वांनी संघटित प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी सिध्दरामय्या यांनी केले.

दरम्यान, जिल्ह्यातील एका प्रभावी नेत्याच्या शिफारशीवरून हायकमांडने लक्ष्मी हेब्बाळकर यांना दिल्लीला येण्याचे निमंत्रण दिले आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी खानापूरच्या आमदार अंजली निंबाळकर, विवेकराव पाटील, नागराज यादव, चन्नराज हेब्बाळकर इच्छुक आहेत. बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी या दुसऱ्या लोकसभा मतदारसंघात प्रकाश हुक्केरी विद्यमान खासदार आहेत. येत्या निवडणुकीत त्यांचीच उमेदवारी निश्‍चित आहे.

सिध्दरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश गुंडूराव, वन खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, अंजली निंबाळकर, आमदार गणेश हुक्केरी, महेश कुमठळ्ळी, माजी आमदार फिरोज सेठ, शाम घाटगे, वीरकुमार पाटील, काकासाहेब पाटील, ए. बी. पाटील व जिल्ह्यातील इतर नेते उपस्थित होते.

आपण पक्ष नेत्यांच्या निर्णयाचे पालन करण्यास कटिबध्द आहे. काँग्रेसकडून जो उमेदवार असेल त्यास विजयी करण्यासाठी प्रयत्नशील राहाणार आहे.
- लक्ष्मी हेब्बाळकर,
आमदार

रमेश जारकीहोळी अनुपस्थित
असंतुष्ट आमदार व माजी मंत्री रमेश जारकीहोळी बैठकीला अनुपस्थित होते. काँग्रेस पक्ष सोडणार नसल्याचे ते सांगत असले तरी पक्षाच्या बैठकांना व कार्यक्रमांना ते अद्यापही अनुपस्थित राहत आहेत. विशेष म्हणजे त्यांचे सहकारी व दुसरे असंतुष्ट आमदार अथणीचे महेश कुमठळ्ळी बैठकीला उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com