Loksabha 2019 : मोदी-शहा विरोधात मनसे घरोघरी जाऊन करणार प्रचार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

राष्ट्रवादीला मिळणार थेट लाभ

मनसेच्या या प्रचाराचा राष्ट्रवादीला थेट लाभ मिळण्याची चिन्हे असून, राज ठाकरे यांना मानणाऱ्या वर्गाची मते या निमित्ताने सुप्रिया सुळे यांच्या पारड्यात पडणार हे आता निश्चित झाले आहे.

बारामती शहर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना बारामती लोकसभा मतदारसंघात नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या विरोधात घरोघरी जाऊन प्रचार करणार आहे. मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक काल बारामतीमध्ये झाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार व मनसेचे नेते अनिल शिदोरे व राजेंद्र वागजकर यांच्या सूचनेनुसार मनसेचे कार्यकर्ते मोदी-शहा यांच्या विरोधात घरोघरी जाऊन प्रचार करणार आहेत, असे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. सुधीर पाटसकर यांनी दिली.

मनसेची कोणत्याही पक्षासोबत आघाडी नाही. त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते इतर कोणत्याही पक्षाच्या मंचावर किंवा प्रचारात सहभागी होणार नाहीत. तसेच मनसेच्या व्यासपीठावर इतर कोणत्याही पक्षाचे नेते नसतील. सध्या देशाचे हित लक्षात घेत दिल्लीमध्ये मोदी- शहा मुक्त सरकार स्थापन व्हावे, याला मनसेची प्राथमिकता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बारामती लोकसभा मतदारसंघात खडकवासला येथे 18 एप्रिल रोजी सभा आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात मनसेचे कार्यकर्ते भाजपविरोधात प्रचार करणार असून, मनसे यासाठी स्वतःची प्रचार यंत्रणा राबवणार आहे.

यावेळी पुणे जिल्हा उपाध्यक्ष पोपटराव सूर्यवंशी, रामभाऊ काळे, सागर पाटसकर, राजेंद्र हजारे, बारामती तालुका अध्यक्ष निलेश वाबळे, इंदापूर तालुका अध्यक्ष संतोष भिसे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादीला मिळणार थेट लाभ

मनसेच्या या प्रचाराचा राष्ट्रवादीला थेट लाभ मिळण्याची चिन्हे असून, राज ठाकरे यांना मानणाऱ्या वर्गाची मते या निमित्ताने सुप्रिया सुळे यांच्या पारड्यात पडणार हे आता निश्चित झाले आहे.

Web Title: MNS Start Election Campaign Against Modi Shah