Loksabha 2019 : मोदींच्या काळात अर्थव्यवस्था डबघाईस : डॉ. मनमोहनसिंग

Loksabha 2019 : मोदींच्या काळात अर्थव्यवस्था डबघाईस : डॉ. मनमोहनसिंग

नवी दिल्ली : अच्छे दिनचे स्वप्न दाखवत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात भारताची अर्थव्यवस्था डबघाईस आली असून, देशातील युवक, उद्योजक, व्यापारी, शेतकरी घटकासाठी आणि प्रत्येक लोकशाही संस्थेसाठी हा काळ सर्वाधिक त्रासदायक आणि हानीकारक ठरला, अशी टीका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आज केली. 

"पीटीआय'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत डॉ. मनमोहनसिंग म्हणाले, की जे सरकार सर्वसमावेशक विकासावर विश्‍वास ठेवत नाहीत ते द्वेषाच्या बळावर राजकीय अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करतात आणि अशा सरकारला बाहेरचा रस्ता दाखवायला हवा. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्‌द्‌यावर मोदी सरकारचे रेकॉर्ड निराशाजनक आहे. कारण दहशतवादी कारवायात झालेली वाढ, हे अपयशाचा आलेख सांगतो. न बोलवताही पाकिस्तानला जाणे आणि पठाणकोटला आयएसआयला निमंत्रित करणे, ही पाकिस्तानसंबंधी परराष्ट्र धोरणातील निष्काळजीपणा आहे, असेही सिंग म्हणाले.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर कॅबिनेट कमिटी ऑन सिक्‍युरिटी (सीसीएस) बैठकीचे नेतृत्व करण्याऐवजी पंतप्रधान मोदी हे जिम कॉर्बेट पार्कमध्ये चित्रपटाच्या शूटिंगमध्ये होते, असा आरोप माजी पंतप्रधानांनी केला. शंभरवेळेस खोटे सांगितले म्हणजे ती बाब सत्य ठरत नाही. जम्मू-काश्‍मीरमधील दहशतवादी हल्ल्याचे प्रमाण 176 टक्‍क्‍यांनी वाढले. तर, पाकिस्तानच्या शस्त्रसंधी भंगाच्या घटनांत हजारपटीने वाढ झाल्याचे ते म्हणाले. भारतीय अर्थव्यवस्था मंदीच्या दिशेने जात असून, मोदी सरकारने चांगल्या अर्थव्यवस्थेची स्थिती खराब केली, असे ते म्हणाले. मोदी सरकारचा पाच वर्षांचा कार्यकाळ हा शासन आणि जबाबदारीच्या पातळीवर अपयशाची कहानी होती. 2014 मध्ये मोदी यांनी अच्छे दिनचे स्वप्न दाखविले आणि सत्तेत आले. मात्र, तरुण, शेतकरी, उद्योजक, व्यापाऱ्यांसाठी हा कार्यकाळ वाईट ठरला. 

मोदी सरकारच्या राजवटीत भ्रष्टाचाराचे प्रमाण अवाढव्य वाढले. नोटाबंदीचा निर्णय हा कदाचित स्वातंत्र्यानंतरचा सर्वांत मोठा गैरव्यवहार असू शकतो. देशातून फरार होणारे भ्रष्टाचारी आणि उच्च राजकीय पदावर बसलेल्या व्यक्तीत निश्‍चितपणे साटेलोटे आहे. 
- डॉ. मनमोहनसिंग, माजी पंतप्रधान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com