Loksabha 2019 : अखेर मोहन जोशी यांचा 'पंजा'; पुण्यातून उमेदवारी जाहीर 

Loksabha 2019 : अखेर मोहन जोशी यांचा 'पंजा'; पुण्यातून उमेदवारी जाहीर 

पुणे : काँग्रेसने पुणे शहर लोकसभा मतदारसंघासाठी पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आणि माजी आमदार मोहन जोशी यांच्या उमेदवारीची सोमवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास घोषणा केली. गेले आठवडाभर काँग्रेसची उमेदवारी कोणाला मिळणार, याबद्दल तर्कवितर्क सुरू होते. जोशी यांना 1999 च्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसकडून शहरात उमेदवारी मिळाली होती. 

काँग्रेसची उमेदवारी प्रवीण गायकवाड, अरविंद शिंदे आणि जोशी यांच्यापैकी कोणाला मिळणार, याबद्दल गेले आठवडाभर चर्चा सुरू होती. उमेदवारी लांबल्यामुळे काँग्रेसने तिन्ही इच्छुकांसह प्रचाराला रविवारी सुरवात केली. शेवटच्या टप्प्यात जोशी यांचे नाव मागे पडले आहे असे वाटत असतानाच, सोमवारी त्यांचे नाव अचानक पुढे आले आणि त्यांची उमेदवारी जाहीर झाली. गायकवाड यांच्या नावाला राष्ट्रवादी काँग्रेसने पसंती दिली होती, तर शिंदे यांच्यासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आग्रही होते. काँग्रेसच्या प्रभारीपदाची सूत्रे दोन दिवसांपूर्वीच सोडलेल्या मल्लिकार्जुन खर्गे यांनी जोशी यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला होता. पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून जोशी यांना अखेर उमेदवारी मिळाली. जोशी यांचा आता भाजपचे उमेदवार गिरीश बापट आणि वंचित विकास आघाडीचे उमेदवार अनिल जाधव यांच्याशी सामना होणार आहे. जोशी सुमारे दहा वर्षे काँग्रेसचे शहराध्यक्ष होते, त्यामुळे त्यांचा शहरात सर्वत्र संपर्क आहे, ही बाब त्यांच्या उमेदवारीसाठी उपयुक्त ठरली. शहर काँग्रेसने पाठविलेल्या तीन नावांमध्येही जोशी यांचा समावेश होता. 

जोशी हे 1972 पासून काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत. त्यांनी 1999 मध्येही काँग्रेसकडून निवडणूक लढविली होती. त्या वेळी त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसकडून विठ्ठल तुपे, तर भारतीय जनता पक्षाकडून प्रदीप रावत प्रतिस्पर्धी होते. जोशी यांना तेव्हा सुमारे सव्वादोन लाख मते मिळून ते दुसऱ्या क्रमांकावर पोचले होते. जोशी यापूर्वी विधान परिषदेवर आमदार होते. तसेच, सुमारे दहा वर्षे शहराध्यक्षही होते. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस, महाराष्ट्र हरिजन सेवक संघाचे अध्यक्षपद, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. जोशी यांनी कारकिर्दीची सुरवात युवक काँग्रेसपासून केली होती. राजस्थान, छत्तीसगड, बिहार, झारखंड, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश आदी राज्यांतील विधानसभा निवडणुकांत त्यांनी पक्षनिरीक्षक म्हणूनही काम केले होते. मेट्रो, एचसीएमटीआर, एसआरएची नियमावली, सार्वजनिक वाहतूक आदी प्रकल्प आणि विकासकामांसाठी त्यांनी आमदार असताना पाठपुरावा केला होता. 

काँग्रेस पक्षासाठी सुमारे 45 वर्षांहून अधिक काळ काम करीत आहे, त्याची दखल घेत पक्षाने कार्यकर्त्यांना चांगला संदेश दिला आहे. पक्षातील कार्यकर्त्यांच्या बळावर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार्याने या निवडणुकीत नक्कीच विजयी होईन, असा मला विश्‍वास आहे. 
- मोहन जोशी, काँग्रेसचे उमेदवार 

मोहन जोशी हे ज्येष्ठ सहकारी आहेत. पक्षाने त्यांना दिलेली उमेदवारी मला मान्य आहे. आम्ही आता जोमाने काँग्रेसचा प्रचार करून जोशी यांना विजयी करू. 
- प्रवीण गायकवाड 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com