Loksabha 2019 : काँग्रेसमुक्त म्हणणाऱ्या मोदींकडून काँग्रेसचा 28 वेळा 'जप'

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 एप्रिल 2019

- लातूरातील सभेत मोदींनी केला काँग्रेसचा 28 वेळा उल्लेख.

- मोदींचे हे भाषण चालले 41 मिनिटं

औसा : 'काँग्रेसमुक्त भारत' अशी घोषणा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता काँग्रेसची एवढी दखल घ्यावी लागत आहे, की काँग्रेसने केलेल्या जाहीरनाम्यावरून आणि त्यांच्या धोरणावरून मोदींनी त्यांना लक्ष्य केले आहे. लातूर जिल्ह्यातील औसा येथे आज (मंगळवार) झालेल्या सभेत मोदींनी 41 मिनिटांच्या भाषणात तब्बल 28 वेळा काँग्रेसच्या नावाचा उल्लेख केला.

लातूर जिल्ह्यातील औसा येथे आज (मंगळवार) महायुतीची सभा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रथमच सभेसाठी एकत्र आले होते. यावेळी मोदी आणि उद्धव ठाकरे हातात हात घालून स्टेजवर आल्याचे पाहायला मिळाले. तर मोदींनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख लहान भाऊ असा केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह रिपाइं नेते रामदास आठवले आणि प्रमुख नेते उपस्थित होते.

मोदींनी आपल्या भाषणात काँग्रेसचा तब्बल 28 वेळा जप केल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या 41 मिनिटांच्या भाषणात ते 17 मिनिटे काँग्रेसशी संबंधित विषयांवर बोलले. काँग्रेसच्या जाहीरनाम्याला त्यांना 'ढकोसलापत्र' असे संबोधले. तसेच त्यांनी जाहीर केलेल्या योजनांवरही टीकास्त्र सोडले. पाकिस्तानला हव्या असलेल्या गोष्टी काँग्रेस करत असल्याचे म्हणत त्यांनी नवमतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Narendra Modi taken name of Congress party for Twenty Eight Times in Election Campaign