Loksabha 2019 : आमच्या कुटुंबाबद्दल सुप्रियाताई आणि मी पाहून घेऊ : अजित पवार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

अच्छे दिन येणार म्हणणारे आता का काही बोलत नाही. काळा पैसा येणार होता, भ्रष्टाचार कमी होणार होता आता का काही बोलत नाही. राफेल कराराबाबत तुम्ही का काही बोलत नाही. पाच वर्षापूर्वी दिलेल्या आश्वासनांबद्दल आता मोदी शब्दही बोलत नाहीत.

पुणे : देशाचे पंतप्रधान वर्ध्यातील सभेत देशाच्या कुटुंबाबद्दल बोलण्यापेक्षा पवार कुटुंबाबद्दल बोलतात. आमच्या कुटुंबाचे बघायला मी आणि माझी बहिण आहे. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग कमी बोलत होते, पण मुद्द्याचे बोलत होते. पण, आताच्या पंतप्रधानांनी शेतकरी, बेरोजगारी, महिला, गरीबी यांच्याबद्दल बोलण्यापेक्षा आमच्या कुटुंबाची काळजी करत आहेत, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. 

पुणे आणि बारामतीतील आघाडीचे उमेदवार सुप्रिया सुळे आणि मोहन जोशी यांनी आज (बुधवार) शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. यावेळी झालेल्या प्रचारसभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी केलेल्या भाषणात भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले.

अजित पवार म्हणाले, ''अच्छे दिन येणार म्हणणारे आता का काही बोलत नाही. काळा पैसा येणार होता, भ्रष्टाचार कमी होणार होता आता का काही बोलत नाही. राफेल कराराबाबत तुम्ही का काही बोलत नाही. पाच वर्षापूर्वी दिलेल्या आश्वासनांबद्दल आता मोदी शब्दही बोलत नाहीत. देशाचे पंतप्रधान येतात आणि मी सहा वर्षांपूर्वी अनावधनाने बोललेल्या वक्तव्याची पुनरावृत्ती करतात. मी याबाबत सगळीकडे माफी मागितलेली आहे, आत्मक्लेश केला आहे. मोदींना तुम्ही विष्णुचा अवतार म्हणता, शेतकऱ्यांना साले म्हणता, मुलींना पळवून नेण्याची भाषा करता. जो माणूस काम करतो तोच चुकतो. राहुल गांधींनी देशाच्या भविष्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. याचा फायदा गरीबांना होणार आहे. न्याय योजनेतून 72 हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत. रोजगारासाठी तीन वर्षे तुम्हाला परवानगीची गरज राहणार नाही. जीएसटीची करप्रणाली सुटसुटीत होईल. 

Web Title: NCP leader Ajit Pawar attacks Narendra Modi and BJP in Pune rally