Loksabha 2019 : अनंत गीतेंचा उमेदवारी अर्ज बाद

शुनील पाटकर
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

उमेदवार अनंत पद्मा गीते यांचा उमेदवारी अर्ज छाननीमध्ये बाद झाल्याने शिवसेनेचे अनंत गीते यांना दिलासा मिळाला आहे.

महाड : रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांचे नामसाधर्म्य असलेला उमेदवार अनंत पद्मा गीते यांचा उमेदवारी अर्ज छाननीमध्ये बाद झाल्याने शिवसेनेचे अनंत गीते यांना दिलासा मिळाला आहे.

आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या नावाशी साधर्म्य असलेले अन्य दोन उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याने सुनील तटकरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आज 26 उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी करण्यात आली. या छाननीमध्ये दोन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आज अर्जांची छाननी करण्यात आली. यावेळी केंद्रीय निवडणूक निरीक्षक रवींद्र सिंह, निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, उमेदवार, उमेदवारांचे सूचक, वकील व प्रतिनिधी उपस्थित होते. छाननीमध्ये अदिती सुनील तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) आणि अनंत पद्मा गीते (अपक्ष), या दोघांचे अर्ज नामंजूर करण्यात आले. सारख्याच नावाचे उमेदवार उभे केल्याने मत विभागणी होऊन विरोधकांना याचा फायदा होतो. अशा राजकीय गणितांनी रायगड मतदार संघात प्रमुख उमेदवारासह अनंत गीते नावाचे दोन व सुनील तटकरे नावाच्या तीन उमेदवारांना अर्ज दाखल केले होते.

छाननीनंतर अनंत गंगाराम गीते (शिवसेना), सुनील दत्तात्रय तटकरे (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी), सुनील सखाराम तटकरे (अपक्ष), सुनील पांडुरंग तटकरे (अपक्ष), श्रीनिवास सत्यनारायण मट्टपरती (अपक्ष), संजय अनंत पाशिलकर (बळीराज पार्टी), नथुराम भगुराम हाते (बहुजन मुक्ती पार्टी), अशोक दाजी जंगले  (अपक्ष), सुमन भास्कर कोळी (वंचितबहुजन आघाडी), मिलिंद भागुराम साळवी (बहुजन समाज पार्टी), मधुकर महादेव खामकर (अखिल भारत हिंदू महासभा), संदीप पांडुरंग पार्टे (बहुजन महा पार्टी) विलास गजानन सावंत (महाराष्ट्र क्रांती सेना), सचिन भास्कर कोळी,( वंचित बहुजन आघाडी), गजेंद्र परशुराम तुरबाडकर, (क्रांतिकारी जयहिंद सेना), प्रकाश सखाराम कळके,( भारतीय किसान पार्टी), असे 24 अर्ज मंजूर झाले.

तर अनंत पद्मा गीते यांचा अर्ज बाद झाल्याने शिवसेनेत उत्साहाचे वातावरण आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 8 एप्रिल असून, नामसार्धम्य असलेले तटकरे रिंगणात राहतात की अर्ज मागे घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Nomination Form of Anant Padma Gite is Rejected