Election Results : आता राज ठाकरेंनी करमणूक कर भरावा : तावडे

गुरुवार, 23 मे 2019

- लोकसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंनी विविध सभा घेऊन साधला होता नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकांची मनसोक्त करमणूक केली. त्यांच्या या कामाबद्दल त्यांनी आता सरकारकडे करमणूक कर भरावा, असा टोला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लगावला. 

गोरेगावच्या मतमोजणी केंद्रात ते पत्रकारांशी बोलत होते. लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. यामध्ये भाजप सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे. या निकालानंतर काही तासांत आता भाजपकडून प्रतिक्रिया आली आहे. यामध्ये भाजपचे नेते आणि मंत्री तावडे म्हणाले, राज ठाकरे यांच्या सभांमुळे आमचे काहीही नुकसान झालेले नाही. उलट त्यामुळे धोका नको, म्हणून आमचे मतदार त्वेषाने बाहेर पडले, असेही तावडे म्हणाले.

तसेच ते पुढे म्हणाले, आज अशोक चव्हाण, पार्थ पवार हे मातब्बर पराभूत झाले. याचा अर्थ राज्यात काँग्रेस संपत चालली आहे. पुढील काळात सेना भाजप युतीच राज्याचा विकास करेल ही खूणगाठ जनतेने बांधली आहे. मोदींची विकासकामे, सुरक्षाविषयक भूमिका व जगात भारताचा वाढवलेला मान, यामुळे मुंबई त सहाही जागांवर युती जिंकली.

राजकीय विश्लेषकांचे जमिनीशी नाते तुटले आहे. मोदींवर कलाकारांनी टीका केली, तरीही उर्मिला मातोंडकर विजयी झाल्या नाहीत. कारण मतदारांना जागरुकपणे काम करणारा गोपाळ शेट्टी यांच्यासारखा कार्यकर्ता हवा आहे, असेही तावडे म्हणाले.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचा आम्हाला थोडा फायदा झाला. पण त्यांना अपेक्षेइतकी मते मिळाली नाहीत, असेही त्यांनी दाखवून दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now Raj Thackeray Should pay Entertainment Tax says Vinod Tawde