Loksabha2019 : राहुल गांधींच्या रॅलीतील झेंडे पाकिस्तानचे नाही

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

ते झेंडे पाकिस्तानचे नसून, इंडियन यूनियन मुस्लिम लीग या केरळमधील प्रादेशिक पक्षाचा तो झेंडा आहे. हा पक्ष केरळमध्ये काँग्रेसचा मित्र पक्ष आहे. 

नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी गुरुवारी वायनाड लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला. यावेळी प्रचंड मोठी रॅली काढण्यात आली होती. परंतु, या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यावरून राहुल गांधी आणि काँग्रेसवर सोशल मीडियावर टीका करण्यात आली. प्रत्यक्षात मात्र ते झेंडे पाकिस्तानचे नसून, इंडियन यूनियन मुस्लिम लीग या केरळमधील प्रादेशिक पक्षाचा तो झेंडा आहे. हा पक्ष केरळमध्ये काँग्रेसचा मित्र पक्ष आहे. 

राहुल गांधींच्या रॅलीत इंडियन यूनियन मुस्लिम लीगचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. यावेळी चांद-तारा असलेले हिरवे झेंडे घेऊन हे कार्यकर्ते मोठमोठ्याने घोषणा देत होते. 

दरम्यान, 'नव्या मतदारसंघात राहुल गांधींचा पाकिस्तानी झेंड्यांसोबत निवडणूक प्रचार,' ओळींसकट हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओतील झेंडे पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाशी मिळते जुळते असल्याने अनेकांना हे झेंडे पाकिस्तानचेच असल्याचे वाटत होते. 

दोन्ही झेंड्यांमध्ये फरक
नीट पाहिले तर दोन्ही झेंड्यांमध्ये फरक आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजात हिरव्या रंगावर चांद-तारा आणि बाजूला एक मोठी पांढरी पट्टी आहे. तर लीगच्या झेंड्यामध्ये पांढरी पट्टी नाही. शिवाय दोन्ही झेंड्यांमधील चांद-ताऱ्यांची स्थिती वेगवेगळी आहे. 

Web Title: Pakistani flags were not waved at Rahul Gandhis roadshow in Waynad