Loksabha 2019 : नेत्यांच्या प्रेरणादायी निरोपानंतर कार्यकर्ते आपआपल्या कामाला

अमित गवळे
बुधवार, 24 एप्रिल 2019

निवडणूक झाल्यानंतर जो-तो कार्यकर्ता आपआपल्या कामाला लागला आहे. मतदान संपल्यावर विविध पक्षाच्या नेत्यांनी व पदाधिकारांनी कार्यकर्त्यांची पाठ ठोपटून त्यांना निरोप दिला.

पाली : रायगड लोकसभा मतदार संघाची निवडणूक मंगळवारी (ता.23) पार पडली. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक प्रचारात झोकून घेतले होते. मात्र आता निवडणूक झाल्यानंतर जो-तो कार्यकर्ता आपआपल्या कामाला लागला आहे. मतदान संपल्यावर विविध पक्षाच्या नेत्यांनी व पदाधिकारांनी कार्यकर्त्यांची पाठ ठोपटून त्यांना निरोप दिला.

शेकाप चे आमदार धैर्यशिल पाटील यांनी देखिल मंगळवारी (ता.23) सायंकाळी आपल्या कार्यकर्त्यांना प्रेरणादायी निरोप दिला आणि पुढच्या निवडणूकिला कामाला लागण्याच्या सुचना दिल्या. निवडणूकीच्या तारखा जाहिर झाल्यापासूनच पदाधिकारी व कार्यकर्ते विविध मार्गांनी आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी लागले होते. तहानभूख हरपुन उन्हाची पर्वा न करता कार्यकर्ते मेहनत घेत होते. काही नोकरदार कार्यकर्ते तर आठवडाभर रजा घेवून निवडणूक प्रचार प्रसाराला लागले होते. आता मात्र सर्वजण निवांत झाले असून आपआपल्या कामाला लागले आहेत व कुटूंबाकडे लक्ष देत आहेत. 23 मे ला लागणाऱ्या निकालावरच सर्वांचे लक्ष लागले आहे असल्याचे सुशील या कार्यकर्त्याने सांगितले.

रोजची खावटी (खर्ची) बंद
काही ठरावीक कार्यकर्ते व मतदारांना सांभाळण्यासाठी त्यांना वेगळी खावटी (खर्ची) दिली जाते. निवडणूकीच्या पंधरा दिवस आगोदर पासून हि खावटी किंवा खर्ची सुरु होते. ज्याच्याकडे जेवढे जास्त मतदार त्याला तेवढी मोठी खावटी. यात रात्रीच्या जेवणा खावणाची व्यवस्था असते. तसेच खर्चापाण्याला काही पैसे देखिल असतात. आता निवडणूक झाल्याने रोजची खावटी (खर्ची) बंद झाली आहे. आता आपली सोय कशी होणार? असा अनेक कार्यकर्त्यांना प्रश्न पडला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Party workers goes back to their work as voting gets over in raigad loksabha constituency