Loksabha 2019 : ९ वाजताच मतदान...९ क्रमांकाचीच गाडी...

बुधवार, 24 एप्रिल 2019

राजकारण हा आकड्यांचा खेळ आहे. ज्याच्याकडे जास्त संख्या तो वरचढ हे साधे सोपे सत्तेचे गणित. पण त्याही पलिकडे काही आकडे राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतात. ९ ही संख्या त्यातलीच. या नऊ क्रमांकाची मोहिनी अनेक राजकारण्यांवर असल्याचं दिसतं.

राजकारण हा आकड्यांचा खेळ आहे. ज्याच्याकडे जास्त संख्या तो वरचढ हे साधे सोपे सत्तेचे गणित. पण त्याही पलिकडे काही आकडे राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतात. ९ ही संख्या त्यातलीच. या नऊ क्रमांकाची मोहिनी अनेक राजकारण्यांवर असल्याचं दिसतं. म्हणूनच अनेकांच्या मोटारींचा शेवटचा क्रमांक ९ किंवा ०९ असा असतो किंवा संपूर्ण क्रमांकाची बेरीज तरी नऊ असेल असा आकडा नंबरप्लेटसाठी निवडला जातो. हीच बाब मतदानाची.

काल होते लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातले मतदान. अनेक उमेदवारांनी स्वतःच्या मतदानाची वेळ निवडली होती सकाळी नऊची. नऊच का? आठ का नाही आणि दहा का नाही. महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांच्या मोटारींचा शेवटचा क्रमांक आहे ९. केवळ नेतेच नव्हे तर अभिनेता सलमानखानच्या गाडीच्या क्रमांकाचीही बेरीज होते ९. संख्याशास्त्राचा किंवा Neumerologyचा अभ्यास करणाऱ्यांकडून याबाबत माहिती घेतली असता मनोरंजन होईल, अशा अनेक बाबी समोर आल्या.

या अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार संख्याशास्त्र हे मूळ ० ते ९ या मूलांकामध्ये मांडले जाते. १- सुर्य, २ - चंद्र, ३ - गुरु, ४ - हर्षल, ५ -बुध, ६- शुक्र, ७ - नेपच्यून, ८ - शनी आणि ९- मंगळ असा प्रत्येक आकडा एकेका ग्रहाच्या अधिपत्याखाली येतो. थोडक्यात संख्याशास्त्राप्रमाणे '९' अर्थातच मंगळाच्या अधिपत्याखाली येणारा म्हणजेच मंगळाचे गुणधर्म दर्शवणारा आकडा आहे. हे गुण आहेत अफाट उर्जा, शक्ती, उग्रपणा, वर्चस्व. सत्तास्थानी असलेल्या किंवा राजकारणात वर्चस्व असलेल्यांच्या अंगी हे गुण हमखास दिसतात. त्यामुळेच त्यांना '९' हा आकडा प्रिय असावा. किंवा हे गुण अंगी रहावेत म्हणून कुठल्या Neumoerologist कडून त्यांनी या आकड्याचे महत्त्व जाणून घेऊन त्याचा वापर सुरु केला असण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

संख्याशास्त्रातली आणखी एक गंमत म्हणजे कुठल्याही मुलांकाला नऊ या आकड्याने गुणले तर त्या येणाऱ्या उत्तराची बेरीज ही ९ च राहते. उदा. ४ x ९ = ३६ (३ + ६ = ९) किंवा ८ x ९ = ७२ (७ + २ = ९) थोडक्यात आपले सर्व गुणाकार शेवटी आपल्यापाशीच यावेत, आपल्याला, आपल्या पक्षाला फायदा मिळावा बहुतांश राजकारण्यांचा हेतू असतो. त्यातूनही ही ९ आकड्याची जवळीक वाढली असावी. कुठल्याही मुलांकात ९ हा आकडा मिळवला तर येणारी बेरीज हा तो मुलांक असतो ही आणखी एक गंमत. उदा. ४ + ९ = १३ (१ + ३ = ४) मी तुमचाच आहे, तुमच्या भावना मी जाणल्यात हे दाखवून आपले समर्थक कायम आपल्याबरोबरच रहावेत, हा उद्देशही ९ या आकड्याचा वापर करण्यामागे असू शकतो.

मात्र, संख्याशास्त्र या ९ आकड्याचे काही दुर्गुणही सांगते, असे अभ्यासक सांगतात. हा आकडा अपघातप्रवण (Accidental Prone) आहे, असे संख्याशास्त्राचे म्हणणे आहे. राजकारणात होणारे घातपात, अपघात, दगाफटका हा या ९ आकड्यामध्ये असलेल्या दुर्गणांचाही प्रभाव असू शकतो, असे हे अभ्यासक मानतात. ९ हा क्रमांक जिद्दही दाखवतो. जी राजकारण्यांसाठी आवश्यक असते आणि कधी घातकही ठरू शकतो.

अर्थात हे सारे मानणारे मानतील आणि जे मानत नाहीत हे खिल्ली उडवतील. अंधश्रद्धा म्हणूनही यावर टीका होऊ शकते. पण निवडणुकीच्या गंभीर वातावरणाकडे थोड्या वेगळ्या नजरेने पाहिलं की अशा गमती-जमती दिसून येतात. त्यातली गंमत अनुभवायची आणि निकालाची वाट बघायची. आपल्या हातात दुसरं आहे काय?

(वैधानिक इशारा - यातून राजकारण्यांच्या गाड्यांचे नंबर निरखून पाहण्याची किंवा त्यांच्या शेवटच्या चार क्रमांकांची बेरीज करण्याची सवय लागू शकते. ही सवय करमणुकीसाठी चांगली पण डोळ्यांसाठी घातक आहे.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Politicians prefers 9 number as per numerology