श्रीरंग बारणे अब्जाधीश; संपत्तीत 35 कोटींची वाढ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

मावळचे शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांची एकट्याची प्रॉपर्टी गेल्या पाच वर्षात १७ कोटी १७ लाख २८ हजार ६४७ रुपयांनी वाढली.

पिंपरी : मावळचे शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांची एकट्याची प्रॉपर्टी गेल्या पाच वर्षात १७ कोटी १७ लाख २८ हजार ६४७ रुपयांनी वाढली आहे. श्री आणि सौ बारणे अशा दोघांच्या मालमत्तेत गेल्या पाच वर्षात ३५ कोटी ५८ लाख ६८ हजार ७३० रुपयांने वाढ झाली आहे. दहावी नापास बारणे हे पत्नीची मालमत्ता मिळून अब्जाधीश आहेत.

शेती, बांधकाम व्यावसायिक आणि वीट कारखानदारी हे बारणे यांचे व्यवसाय आहेत.गत लोकसभा निवडणुकीच्या वेळी २०१४ ला उमेदवारी अर्ज दाखल करताना बारणे कुटुंबांने  ६६ कोटी २४ लाख ४१हजार ४०४ रुपये एवढी आपली मालमत्ता दाखवली होती. त्यात श्री बारणे यांची ५२ कोटी ४३ लाख २९ हजार २०९ रुपयांची,तर पत्नी सरिता यांचा १३ कोटी ९९ हजार ७२५ रुपयांची प्रॉपर्टी होती. जंगमपेक्षा स्थावर मालमत्ता त्यांची बहुतांश आहे. वेंब्ली अँड स्कॉट बनावटीचे रिव्हॉल्व्हर आणि मर्सिडीज बेंझ,ऑडी,फॉर्च्यूनर,आय २० अशा चार आलिशान मोटारी त्यांच्याकडे त्यावेळी होत्या. 

बारणे यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज सादर केला. त्यासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या मालमत्तेचा तपशील दिला आहे. आता त्यांच्या नावे ८२ कोटी ८१ लाख ४६ हजार ८२० रुपयांची प्रॉपर्टी आहे. त्यात १३ कोटी वीस लाख ८८हजार ९६४ रुपयांची जंगम, तर ६९ कोटी साठ लाख ५७ हजार ८५६ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

पत्नी सरिता यांची ५७ लाख पाच हजार ६४६ रुपयांची जंगम,तर १८ कोटी ९४ लाख ५७ हजार ६६८ रुपयांची स्थावर प्रॉपर्टी आहे. तर, मोटारीसाठीचे चार लाख १६ हजार ६१२ रुपयांचे बँक कर्ज त्यांंच्यावर आहे.

Web Title: Property of Shrirang Barne has increased by 35 Crores