Loksabha 2019 : सभा न झाल्याने मुख्यमंत्री शांत झोपले असतील : राज ठाकरे

Tuesday, 23 April 2019

- मी दोन दिवस सभा न घेतल्याने मुख्यमंत्र्यांना शांत झोप लागली असेल.

मुंबई : मी दोन दिवस सभा न घेतल्याने मुख्यमंत्र्यांना शांत झोप लागली असेल. मुख्यमंत्री भांबावले आहेत, काय उत्तरे द्यायची राज ठाकरे यांच्या प्रश्नांना हे त्यांना कळत नाही. माझी स्क्रिप्ट बारामतीवरून आलेली आहे असे म्हणत आहेत. मला शरद पवारांचा पोपट म्हणत आहेत. कपडे मी त्यांचे काढले आणि त्यांना माझा पोपट दिसत आहे. मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या, अशी जोरदार टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

मुंबईत राज ठाकरे यांची यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पहिलीच सभा झाली. या सभेला मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर राज यांनी आतापर्यंत टीकास्त्र सोडले आहे. आताही त्यांनी या दोघांनाच लक्ष्य केले.

राज ठाकरे म्हणाले, की भाजपवाल्यांचा मुळ पुरुष मोदी यांनी एवढे खोटे बोलून ठेवले आहे, की याचे समर्थन कसे करायचे हे यांना कळत नाही. होय, मी काँग्रेसवर टीका केली होती. पण, ते नालायक होते म्हणून तुम्हाला आणले तर तुम्ही त्यांच्यापेक्षा नालायक निघाला. 2014 पूर्वी ते सत्तेत होते, तेव्हा त्यांचे वाभाडे काढले, आता तुमचे काढतोय.  शरद पवारांच्या दिल्लीतील बंगल्यावर कोण-कोण जातात हे एकदा सांगू का?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj Thackeray Criticizes CM Devendra Fadnavis in Mumbai