LokSabha 2019 : विधानसभेसाठी राज यांची झाकली मूठ...

LokSabha 2019 : विधानसभेसाठी राज यांची झाकली मूठ...

मुंबई - लोकसभा मतदारसंघात असलेली तोळामासाची ताकद आणि निवडणूक लढविताना येणारा अफाट खर्च लक्षात घेऊन लोकसभा निवडणूक न लढविता आगामी विधानसभेसाठी राज ठाकरे यांनी ‘झाकली मूळ सव्वा लाखाची’ असा निर्णय घेतल्याची चर्चा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे.

राज ठाकरे यांनी पक्ष स्थापल्यानंतर सन २००९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोजक्‍या ठिकाणी उमेदवार उभे केले होते. या वेळी राज यांच्या करिष्म्यावर मनसे उमेदवारांनी लाखांच्या घरात मते घेतली होती. त्यानंतर काही महिन्यांतच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत हाच करिष्मा कायम राहिल्याने पहिल्याच प्रयत्नात त्यांनी १३ आमदार निवडून आणले होते. त्यानंतर अनेक महापालिकांत दोन आकडी नगरसेवक निवडून आणणाऱ्या राज यांनी नाशिक महापालिकेची सत्ता एकहाती आणली होती. ऑक्‍टोबर २०१३ साली महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले होते. मात्र, शिवसेनेकडून होणाऱ्या टीकेमुळे त्यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या मतदारांसमोर मनसेचे उमेदवार उभे करून एक डाव टाकला; मात्र मराठी मतांच्या फुटीसाठी राज यांनी खेळी केल्याचे शिवसेनेचे आरोप मराठी मतदारांनी खरे मानले आणि याची किंमत पक्षाला चुकवावी लागली होती.

लोकसभा मतदारसंघात मनसेची कमी ताकद आणि खर्च परवडणारा नसल्याने निवडणूक लढविण्यात काहीही अर्थ नसल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच, काही जागांवर निवडणूक लढवलीच आणि अत्यंत कमी मते पडली, तर त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत होणार असल्याने लोकसभा न लढवत झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवण्यात पक्षाचे हित असल्याचे अनेक नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते.

सावध भूमिका
२०१४ पासून पक्षाच्या झालेल्या पडझडीतून राज ठाकरे सावरले असून, सध्या ते भावनेच्या आहारी न जाता सावध भूमिका घेत असल्याचे लोकसभा निवडणूक न लढविण्याच्या भूमिकेतून दिसून येते. गेल्या पाच वर्षांतील घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर लोकसभा निवडणूक लढविण्यास पक्षातील कोणताही नेता तयार नाही. निवडणुकीसाठी लागणारा प्रचंड खर्चही मनसैनिकांना परवडणारा नसल्याचे अनेक पदाधिकाऱ्यांनी राज यांना सांगितल्याची चर्चा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com