Loksabha 2019 : राज ठाकरे यांचे 'स्टँड अप कॉमेडी'चे शो सुरु : विनोद तावडे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 एप्रिल 2019

- नरेंद्र मोदींना जगातील विविध देशांमधून पुरस्कार मिळतायेत.

- राज ठाकरे यांच्याकडून काँग्रेस-राष्ट्रवादीला निवडून देण्याचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे 'स्टँड अप कॉमेडी'चे शो सध्या सुरु आहेत. काल नांदेडला शो झाला व लवकरच महाराष्ट्रात अजूनही काही ठिकाणी त्यांचे स्टॅंड अप कॉमेडीचे शो होणार आहेत, अशी टीका शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज केली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना विनोद तावडे यांनी सांगितले की, राज ठाकरे हे लोकसभा निवडणुकीत स्वत: कुठल्याही उमेदवाराचा प्रचार करीत नाहीत. पण आपल्या जाहिरसभांमध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला निवडून देण्याचे आग्रहाने आवाहन करीत आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या जाहिरसभांचा खर्च हा त्या सभेच्या ठिकाणच्या कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराच्या खात्यात करण्यात यावा, अशी मागणी आम्ही लवकरच निवडणूक आयोगाकडे करणार आहोत, असेही तावडे यांनी स्पष्ट केले. तसेच राज ठाकरे यांच्या जाहिरसभांचा खर्च कुठल्या पक्षाच्या खात्यात दाखविला गेला पाहिजे याची माहितीही निवडणूक आयोगाने जनतेला द्यावी, अशी मागणीही आम्ही करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज ठाकरे सध्या मोदी व अमित शहा यांना संपविण्याची भाषा करित असल्याबद्दल त्यांच्यावर टीका करताना तावडे उपरोधिकपणे म्हणाले, की राज ठाकरे यांच्या पक्षाचा एक खासदार नाही, एक आमदार पण नाही. उरले सुरलेले नगरेसवक सुध्दा पक्ष सोडून गेले. त्यामुळे स्वत:चा पक्ष संपला असताना दुसऱ्याला संपविण्याची भाषा हे कशी काय करतात असा टोलाही त्यांनी लगावला. 

नरेंद्र मोदी यांना जगातील विविध देशांमधून पुरस्कार मिळत आहे. मोदी यांना नुकतेच संयुक्त अरब अमिरातीचा सर्वोच्च ‘झायेद मेडल’ हा नागरी पुरस्कार, दक्षिण कोरियाचा शांतता पुरस्कार, पॅलेस्टाईनचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, संयुक्त राष्ट्र संघाचा पर्यावरण पुरस्कार, अफगाणिस्तानचा आमिर अमानुल्लाह खान पुरस्कार, सौदी अरेबियाचा पुरस्कार, रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाले आहेत. विविध देशांमध्ये मोदी यांना पुरस्कार देण्याची स्पर्धा सुरु आहेत आणि राज ठाकरे यांना मोदी हिटलर वाटत आहेत. पण जगामध्ये हिटलरचे असे कोणी स्वागत केले नव्हते. त्यामुळे राज ठाकरे यांच्या 'रिसोर्स टीम'ने नीट माहिती काढावी व ती त्यांना द्यावी. त्यामुळे मोदी यांच्या संदर्भात जे वास्तव जगाला कळाले ते राज ठाकरे यांनाही कळू शकेल, असा टोलाही तावडे यांनी मारला.

अजित पवार फक्त हूल देतात

भाजपमध्ये ज्यांनी प्रवेश केला. त्यांची कागदपत्रे माझ्याकडे असून, निवडणुका संपल्यानंतर ती कागदपत्रे दाखवेन, असे विधान करणाऱ्या अजित पवार यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, की अजित पवार फक्त हूल देत आहेत. अजित पवार हे कबड्डी असोशिएशनचे अध्यक्ष आहेत. कबड्डी खेळामध्ये खेळाडूला एखादा गडी बाद करता आला नाही तर तो फक्त मैदानात एंट्री करतो आणि प्रतिस्पर्धी संघाला नुसती हुल मारुन येतो, तसा अजित पवार यांचा फक्त हुल मारण्याचा प्रकार आहे, अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.

Web Title: Raj Thackerays Start Up Comedy show begins says Vinod Tawde