Loksabha 2019 : मोदींसोबत खुल्या चर्चेला तयार : राहुल गांधी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 एप्रिल 2019

नांदेड : एकीकडे सगळी खोटी आश्वासने, अन्याय, अत्याचार आहे आणि दुसरीकडे आमच्याकडून न्याय आणि खरेपणा आहे. त्यामुळेच येत्या निवडणुकीनंतर कुणा एका व्यक्तीचे नाही, तर देशाचे सरकार येणार असल्याचा विश्वास कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केला.

नांदेड : एकीकडे सगळी खोटी आश्वासने, अन्याय, अत्याचार आहे आणि दुसरीकडे आमच्याकडून न्याय आणि खरेपणा आहे. त्यामुळेच येत्या निवडणुकीनंतर कुणा एका व्यक्तीचे नाही, तर देशाचे सरकार येणार असल्याचा विश्वास कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केला.

कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्षांच्या महाआघाडीच्या वतीने नांदेडला आज आयोजित केलेल्या जाहीर सभेत राहुल गांधी यांनी भाजपवर तोफ डागली. "गेल्या पाच वर्षांत नोटाबंदी, जीएसटी कर लागू केल्याने लाखो बेरोजगार झाले. छोटे व्यापारी, दुकानदारांचा व्यवसाय बसला. अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. याआधी एवढी बेरोजगारी कधीच झाली नव्हती. दोन कोटी नोकऱ्या दिल्या नाहीत, शेतकऱ्यांच्या मालाला भाव दिला नाही, 15 लाख खात्यात जमा केले नाहीत. फक्त अंबानी, मोदी, माल्या अशा उद्योजकांची घरे भरली. मी संसदेत प्रश्न उपस्थित केले तेव्हा मोदी डोळा भिडवून बोलू शकले नाहीत. देश का चौकीदार चोर है, हे आता सर्व जनतेला माहिती झाले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मी कधीही, कुठेही आमने - सामने खुली चर्चा करायला तयार आहे,' असे आव्हान राहुल यांनी दिले. पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या सरकारमुळे एकीकडे शेतकरी, गरीब आणि दुसरीकडे उद्योगपती असे दोन हिंदुस्थान तयार झाले आहेत; पण आम्ही ते होऊ देणार नाही. आता या पुढे शेतकऱ्यांनी कर्ज काढले असेल आणि त्याला फेडता येत नसेल तर आम्ही आमचे सरकार आले तर शेतकऱ्यांना जेलमध्ये टाकू देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
देशाच्या चौकीदारमुळे सगळे अडचणीत आले असल्याचे सांगून राहुल यांनी कॉंग्रेसने जाहीर केलेल्या "न्याय' योजनेंतर्गत गरिबांना वर्षाला 72 हजार रुपये देण्याचे, शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प, बेरोजगारांना रोजगाराची संधी व तीन वर्षे सवलत, नोकऱ्या, शेतकऱ्यांना योग्य हमीभाव अशी अनेक आश्‍वासने दिली. या सभेला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह स्थानिक नेते उपस्थित होते. 

'अशोक चव्हाण संपणार नाही' 
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या तीन सभा, गडकरी, गोयल सगळे मंत्रिमंडळ भाजपने नांदेडमध्ये आणले तरी अशोक चव्हाण संपणार नाही. कारण, अशोक चव्हाणांसोबत नांदेडची जनता असल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले. रेल्वेमंत्री गोयल यांनी केलेल्या आरोपांनीही त्यांनी सडेतोड उत्तरे दिली. गडकरी यांचाही त्यांनी समाचार घेतला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ready for open discussion with Narendra Modi says Rahul Gandhi