Loksabha2019 : मतदार बोलत नाहीत... सुप्त लाट आहे का?

प्रकाश पाटील
मंगळवार, 23 एप्रिल 2019

रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड लोकसभा मतदारसंघात आज (ता. २३) मतदान होत असले; तरी मतदारांचा कल कोणाकडे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न दोन्ही मतदारसंघांत केला असता लोक कोणाच्या बाजूने आणि विरोधातही बोलत नाहीत.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड लोकसभा मतदारसंघात आज (ता. २३) मतदान होत असले; तरी मतदारांचा कल कोणाकडे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न दोन्ही मतदारसंघांत केला असता लोक कोणाच्या बाजूने आणि विरोधातही बोलत नाहीत. उद्या काय करायचे, याचा निर्णय आमच्या मनात आहे. एखाद्या ठरावीक पक्षाविरोधातही उघड बोलले नाहीत. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी सुप्त लाट आहे की काय, असा प्रश्‍न पडतो.

रत्नागिरी, नाणार, राजापूर, पावस ते रायगड जिल्ह्यातील पोलादपूर, महाडपासून रोह्यापर्यंत मतदारसंघात दौरा करताना लोक का बोलत नाहीत, असा प्रश्‍न मनात वारंवार येत होता. रत्नागिरी आणि परिसरात तर कोणत्याही उमेदवाराचे फ्लेक्‍स, प्रचार करताना कुठे कार्यकर्त्यांचे घोळके दिसले नाहीत. काही व्यापारी, रिक्षावाले किंवा तरुणाईशी बोलताना ते कोणाचे नाव घेण्याचे धाडस रत्नागिरी शहरात करीत नव्हते. ‘आपणास कळेल कोण निवडून येईल? आता पूर्वीसारखे काही राहिले नाही. तुम्ही प्रचार करा, बॅनर्स लावा किंवा लावू नका; गेली पाच वर्षे लोकप्रतिनिधी या नात्याने काय कामे केली? लोकांचे किंवा सार्वजनिक कामे मार्गी लावली का? मतदारसंघात कोणते प्रोजेक्‍ट आणले? याकडे एक मतदार म्हणून आमचे लक्ष असते. सुशिक्षित मतदारांचे ब्रेनवॉश करावे लागत नाही. मतदारसंघातीलच नव्हे, तर देशात काय चालले आहे, हेही आम्ही जाणून आहोत,’ अशी भूमिका अनेकांनी बोलताना  मांडली.

महाडमध्ये पोचल्यानंतर येथे ‘निवडणूक ज्वर’ दिसेल, असे वाटले होते. पण, रत्नागिरीचेच चित्र येथे होते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांसाठी ऐतिहासिक लढा उभारला; त्या चवदार तळ्यावर पोचल्यानंतर काही मंडळींना बोलते केले. तेथे उपस्थित असलेल्या काही ज्येष्ठ नागरिकाशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘आम्ही निवृत्त झालो आहोत. पण, तेच तेच  चेहरे आणि तेच ते उमेदवार आता नकोसे वाटतात. यांना आणखी किती दिवस सहन करायचे? हा गेला की तो! तो गेला की हा! यापेक्षा तुलनेने नवे नेतृत्व पुढे यायला हवे. तरुणांना संधी मिळायला हवी.’’

लांज्यामध्ये ‘स्वाभिमानी’ची छोटी रॅली झाली. महाडमध्ये राज ठाकरे, प्रकाश आंबेडकरांच्या सभा झाल्या. त्यांच्याप्रमाणेच इतर पक्षांच्याही सभा झाल्या. ‘‘प्रत्येक पक्षाचे विचार लोक ऐकतात. मतदार बोलणार नाही. विचार पटले नाही, तरी तो शांत राहील. पण, जे दाखवायचे आहे ते तो मतपेटीतूून दाखवेल. पूर्वीसारखे मतदारांना गृहीत धरता येणार नाही,’’ असे मत निवृत्त शिक्षक श्रीकांत कांबळे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘मी मूळचा सांगली जिल्ह्यातील कवठेएकंदचा. मला येथे येऊन तीस-पस्तीस वर्षे झाली. महाड हीच माझी कर्मभूमी आहे. गावाकडे संपर्क असतो. महाडही बदलते आहे. आणखी या शहराची प्रगती व्हावी, हीच इच्छा आहे. ज्या बाबासाहेबांनी चवदार तळ्याचा लढा उभारला; त्या ठिकाणीच मी वास्तव्याला आहे, हे मी माझे भाग्य समजतो.’’

Web Title: Reporters diary Prakash patil article Voters do not speak