Sangli Loksabha 2019 : सांगलीत तिरंगी लढत; चारपर्यंत 46.61 टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 एप्रिल 2019

विधानसभा मतदारसंघ निहाय मतदान असे - मिरज 45.85, सांगली 47.40, पलूस 48.76, खानापूर 46.27, तासगाव - कवठेमहांकाळ 46.76,  जत 44.62 टक्के

सांगली - भाजपचे संजय पाटील, स्वाभिमानी विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर अशी तिरंगी लढत असलेल्या सांगली लोकसभा मतदार संघात दुपारी चारपर्यंत 46.61 टक्के मतदान झाले. 

विधानसभा मतदारसंघ निहाय मतदान असे - मिरज 45.85, सांगली 47.40, पलूस 48.76, खानापूर 46.27, तासगाव - कवठेमहांकाळ 46.76,  जत 44.62 टक्के

मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. विद्यमान खासदार संजय पाटील हे भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. तर माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे स्वाभिमानीतर्फे रिंगणात आहेत. वंचित बहूजन आघाडीतर्फे गोपीचंद पडळकर हे रिंगणात आहेत.

सांगलीत सकाळी जिल्ह्यात अनेक केंद्रवर बिघाड झाल्याने मतदानात अडथळे आले. पण प्रशासनाने तातडीने पाऊले उचलत नवीन यंत्रे दिल्याने मतदान सुरळीत सुरु आहे. 

नवरी आली मतदान कराया
हातात कोपरापर्यंत हिरवा चुडा, डोक्यावर मुंडावळ्या आणि अंगभर हळद माखलेली अशी नववधू पैठणी नेसून मतदान केंद्रावर आली अन् अधिकारी- कर्मचाऱ्यांसह सर्वांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या. रांगेतील मतदारांनी स्वतःहून तिला अग्रक्रम दिला. मेंदीने रंगलेल्या बोटावर मतदानाच्या शाईची खूण घेऊन तिने मतदानाचा हक्क बजावला. सोबतच्या वऱ्हाडी महिलांसोबत फोटोसाठी छानशी पोझही दिली. नव्या संसाराचा उंबरठा ओलांडण्यापुर्देवी देशाचा संसारही सक्षम हाती सोपवण्याची जबाबदारी तिने पार पाडली. सिद्धेवाडी ( ता. मिरज ) येथील शुभदा नारायण शितोळे या युवतीचा आज पाटगाव ( ता. मिरज ) येथे शुभविवह झाला. अक्षता पडण्यापुर्वी  शुभदाला कर्तव्याची जाणिव झाली. मैत्रिणी आणि नातेवाईक  महिलांसोबत तिने सिद्धेवाडी ( ता. मिरज ) येथे शाळेतील मतदान केंद्र गाठले. मतदान करुनच ती बोहल्यावर चढली.

आटपाडीत चुरशीने 40 टक्के मतदान 
आटपाडी- सांगली लोकसभा निवडणुकीसाठी आटपाडी तालुक्‍यात दुपारपर्यंत अत्यंत चुरशीने सरासरी 40 टक्के मतदान झाले होते. सकाळच्या सत्रात अनेक मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पाडण्याचे प्रकार घडले. त्यामुळे काही केंद्रावर मतदान सुरू होण्यास उशीर झाला. 

सांगली लोकसभेसाठी आटपाडी तालुक्‍यात सकाळी सात वाजता मतदानाची सुरुवात झाली. मतदानाच्या सुरुवाती अगोदरच मतदारांनी केंद्रावर रांगा लावल्या होत्या. सकाळी शेटफळे येथे प्रभाग क्रमांक पाच मध्ये मशीन सुरू झाले नाही. मशीन सुरू होण्यास दीड तास वेळ गेला. यावेळी एसटी बस चालक तानाजी गायकवाड मतदानासाठी आले होते मात्र मशीन बंद असल्यामुळे आणि ड्युटीची वेळ झाल्यामुळे ते मतदान न करताच कामावर गेले.

तहसीलदार सचिन लंगुटे आणि त्यांच्या पथकाने मशीनची दुरुस्ती केली. त्यानंतर मशीनवर सात मते झाली त्यानंतर हे मशीन पुन्हा बंद पडले. मतदान सुरळीत होण्यासाठी दहा वाजले. आटपाडी तालुक्‍यात करगणी, बाळेवाडी, विभूतवाडी आणि शेटफळे येथील प्रभाग दोन मध्ये मशीन बिघडण्याचे प्रकार घडले. त्यामुळे या केंद्रावर काही वेळ मतदान बंद होते.

तालुक्‍यात सकाळी नऊपर्यंत सरासरी दहा टक्के, बारापर्यंत 25 टक्के तर दुपारी दोन पर्यंत 40 टक्के मतदान झाले होते. मतदानासाठी मोठी गर्दी नसली तरी रांगा लागलेल्या होत्या. दुपारच्या कडक उन्हातही मतदान केंद्रावर मतदारांची वर्दळ होती. मतदान केंद्रे दुपारीही ओस पडली नव्हती. मतदारांच्या उत्साह जाणवत होता. उत्स्फपूतॅपणे मतदार मतदानासाठी घराबाहेर पडले होते. तसेच कार्यकर्त्यांनी मतदारांसाठी येण्या जाण्याची सोय केली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli Loksabha Constituency voting begins