Loksabha 2019 : 'माझ्याविरोधात काकांनाही उमेदवार मिळेना'

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 26 मार्च 2019

आजोबांनी नातवाला फिरायला नेण्याऐवजी नातूच आजोबांना पळवत आहे.

- गिरीश बापट

बारामती शहर : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील चारही जागा सेना भाजप युतीचेच उमेदवार जिंकणार असून, बारामतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी येणार आहेत, अशी माहिती गिरीश बापट यांनी आज दिली. तसेच पुण्यात माझ्याविरोधात काकांनाही (शरद पवार) उमेदवारच मिळेनासा झाला आहे, असेही ते म्हणाले. 

बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजप सेना युतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी आयोजित विजय संकल्प मेळाव्यात बापट यांनी ही माहिती दिली. बापट म्हणाले, पुण्यात मी उभा आहे. त्यामुळे पुण्याची कुस्ती जोरदार होईल, असे मला वाटत होते. पण पुण्यात माझ्याविरोधात काकांनाही (शरद पवार) उमेदवारच मिळेनासा झाला आहे. तर बारामतीत कुल विरुध्द सुळे ही कुस्ती खरी होईल, असेही वक्तव्य बापट यांनी केले.

दरम्यान, बारामतीतील कुल यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्धघाटनासाठी चंद्रकांत पाटील बुधवारी (ता. 27) बारामतीत येणार असल्याचेही यावेळी वासुदेव काळे यांनी जाहीर केले.

नातू आजोबांना पळवतोय

मी पुण्यात उमेदवार म्हणून उभा असलो तरी हातात जे दिवस आहे त्यात बारामती, शिरुर व मावळमध्येही प्रचाराला जाणार आहे. यंदा चारही मतदारसंघात आमचेच उमेदवार विजयी होतील. तसेच आजोबांनी नातवाला फिरायला नेण्याऐवजी नातूच आजोबांना पळवत आहे, अशी टीकाही बापट यांनी केली.

भाषणं करण्यापेक्षा मतदान वाढवा

बूथनिहाय मतदान अधिक करवून घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करायला हवेत. भाषणे करण्यापेक्षा मतदान वाढविण्यासाठी काम केले पाहिजे, असे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले. दोन वेळा संधी दिलेल्या खासदारांना सेल्फी काढण्याखेरीज काहीच जमल नाही. भावनिक प्रचाराला कोणीही बळी पडू नका, असे आवाहनही शिवतारे यांनी केले.

नीलम गोऱ्हे यांनीही सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करत 'कांचनताई दिल्ली में, सेल्फीवाली बाई गल्ली में', अशी निवडणुकीनंतर अवस्था होणार आहे. 

प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे यांनी परिवर्तन अटळ असल्याचे सांगितले. राजेंद्र काळे यांनीही शिवसेना भाजपच्या समवेत काम करेल अशी ग्वाही दिली. 

...तर विद्यार्थी कच्चा कसा

आपल्या मनोगतात कांचन कुल यांनी बापटांचा गुरु तर नरेंद्र मोदींचा महागुरु असा उल्लेख केला. जो विद्यार्थी महागुरुंच्या शाळेतील आहे, तो कच्चा कसा असेल, असा सवाल विचारत या मतदारसंघातील विविध प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करेन, अशी ग्वाही दिली.

शिवतारेंचे जाहीर आव्हान

सुप्रिया सुळे यांनी दोन वेळेस सेल्फी काढण्याखेरीज काहीच केले नाही. त्यांनी मतदारसंघात केलेल्या विकासकामांसोबत सेल्फी काढावेत. आम्ही अशा सेल्फींची वाट बघतोय. माझं त्यांना हे जाहीर आवाहन आहे, असे विजय शिवतारे म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar not gets proper candidate against me for Loksabha Election says Girish Bapat