Loksabha 2019 : शिवसैनिकांनीच दिला ‘चौकीदार चोर है’चा नारा!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 एप्रिल 2019

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपची युती झालेली असली, तरी येथील शिवसेनेच्याच कार्यकर्त्यांनी पक्षाच्या उमदेवाराच्या प्रचार रॅलीत ‘चौकीदार चोर है’चा नारा दिल्याची घटना काल (ता. ६) सकाळी घडली!

मंगरुळपीर - लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपची युती झालेली असली, तरी येथील शिवसेनेच्याच कार्यकर्त्यांनी पक्षाच्या उमदेवाराच्या प्रचार रॅलीत ‘चौकीदार चोर है’चा नारा दिल्याची घटना काल (ता. ६) सकाळी घडली! यानंतर भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत रॅलीच्या सुरवातीलाच हाणामारीपर्यंत परिस्थिती गेली. परिणामी, शिवसेना उमेदवाराची रॅली मोजक्‍या कार्यकर्त्यांच्या साथीने आटपावी लागली.

आज शिवसेनेच्या उमेदवार भावना गवळी यांच्या प्रचारासाठी युतीकडून प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. उमेदवार भावना गवळी शिवाजी चौकात आल्यानंतर त्यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर रॅलीला सुरवात होणार होती. दरम्यान, शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार घातल्यानंतर घोषणा देताना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चक्क ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा दिल्या. या घटनेमुळे उपस्थित भाजपच्या पदाधिकाऱ्यांचाही राग अनावर झाला. त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना चोप देण्यास सुरवात केल्याने शिवाजी चौकात एकच गोंधळ उडाला. भावना गवळी यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद शमला. मात्र, शिवसेनेच्या या रॅलीत भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले नाहीत.

Web Title: Shisaink gave Slogan chowkidar chor hai in Mangrulpir