Loksabha 2019 : राज ठाकरेंच्या महाराष्ट्रात 6 सभा; पुण्यातही तोफ धडाडणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

माझ्या प्रचाराचा आघाडीला फायदा झाला तरी चालेल आणि राहुल गांधींना पंतप्रधानपदी एकदा संधी द्यायला काय हरकत आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा या जोडगोळीला हटवा अशी गर्जना करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात सहा सभा होणार आहेत. पुण्यातही त्यांची 18 एप्रिलला सभा होणार आहे.

राज ठाकरे यांनी नुकताच गुढीपाडवा मेळाव्यात शिवाजी पार्कवर मोदी आणि शहा यांच्यावर जोरदार हल्ला केला होता. भारताच्या भविष्यासाठी या दोघांना हटवा असेही त्यांनी म्हटले होते. माझ्या प्रचाराचा आघाडीला फायदा झाला तरी चालेल आणि राहुल गांधींना पंतप्रधानपदी एकदा संधी द्यायला काय हरकत आहे, असेही म्हटले होते. त्यामुळे आता राज ठाकरेंच्या महाराष्ट्रातील या सहा सभा भाजप-शिवसेना युतीविरोधात असणार हे निश्चित आहे.

राज यांच्या सभांना 12 एप्रिल म्हणजे उद्यापासून नांदेडमधून प्रारंभ होत आहे. त्यानंतर 15 एप्रिलला सोलापूरला, 16 एप्रिलला कोल्हापूरला, 17 एप्रिलला साताऱ्यात, 19 एप्रिलला पुण्यात आणि 19 एप्रिलला महाड (रायगड) येथे सभा होणार आहेत. या दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर करताना मनसेने मोदीशाहीमुक्त भारत हा हॅशटॅग वापरण्यात आला आहे.

Web Title: Six public meeting of Raj Thackeray in Maharashtra