Loksabha 2019 : 'आयईडी'पेक्षा मतदानाची ताकद अधिक : मोदी

Loksabha 2019 : 'आयईडी'पेक्षा मतदानाची ताकद अधिक : मोदी

अहमदाबाद : दहशतवाद्यांच्या आयईडी शस्त्रापेक्षा मतदार ओळखपत्राचे शस्त्र मोठे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आज सकाळी गुजरात लोकसभेसाठी मतदान केल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. मतदारांनी निवडणुकीत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असेही आवाहन त्यांनी या वेळी केले. 

अहमदाबाद येथील रानीप भागातील निशान हायस्कूल येथे मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकाळी खुल्या जीपमधून आले. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनी मोदींचे स्वागत केले. या वेळी मोदींनी हात उंचावून नागरिकांचे आभार मानले. गांधीनगर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मतदान केंद्रावर स्वागत केले. या वेळी शहा कुटुंबीयदेखील उपस्थित होते. अहमदाबादचा काही भाग गांधीनगर मतदारसंघात येतो.

मतदान केंद्रावरही मोदींच्या स्वागतासाठी नागरिक मोठ्या संख्येने जमले होते. मतदान झाल्यानंतर मोदींनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, दहशतवाद्यांच्या आयईडी स्फोटापेक्षा मतदानाची शक्ती अधिक आहे. त्यामुळे मतदानाच्या ओळखपत्राचे महत्त्व ओळखून नागरिकांनी मोठ्या संख्येने त्याचा वापर करण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. सुदैवाने मला आज कर्तव्य बजाविण्याची संधी मिळाली, असेही त्यांनी नमूद केले. 

मातुःश्रींचे घेतले आशीर्वाद 

मतदानापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मातुःश्री हिराबा यांचे आशीर्वाद घेतले. या वेळी मातुःश्रींनी मोदींना मिठाई खाऊ घातली. त्यांनी वीस मिनिटाहून अधिक काळ घरी व्यतीत केला. या वेळी हिराबा यांनी पंतप्रधानांना शाल दिली आणि विजयासाठी आशीर्वाद दिले.

दरम्यान, मोदी यांच्या मातु:श्रींनी देखील मतदानाचा हक्क बजावला. 95 वर्षाच्या हिराबा या लहान मुलगा पंकज यांच्यासमवेत राहतात. त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात मतदानाचा हक्क बजावला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com