खच्चीकरण झालं; म्हणूनच मोहिते-पाटील 'राष्ट्रवादी'तून बाहेर पडले

खच्चीकरण झालं; म्हणूनच मोहिते-पाटील 'राष्ट्रवादी'तून बाहेर पडले

करकंब (पंढरपूर) : निष्ठा आणि संयम म्हणत अनेकवेळा जाहिरातबाजी केलेल्या मोहितेपाटलांच्या सहनशक्तीचा अंत राष्ट्रवादीने गेल्या दहा वर्षात पाहिला. परिणामी संयम संपलेल्या रणजितसिंह यांनी निष्ठा पणाला लावत घड्याळाची टिकटिक बंद करुन हाती कमळ घेतले. हे करत असताना त्यांनी शेतकऱ्याच्या हितासाठी कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना पूर्ण करण्याचे मुख्य कारण सांगितले आहे. पण वास्तविक पाहता गेल्या दहा वर्षातील मोहिते-पाटलांचे खर्चीकरण पाहता स्थिरीकरण कृष्णा-भीमेचे, मोहिते-पाटलांचे याबाबत मात्र, सध्या जोरदार चर्चा सुरु आहेत.

सोलापूर जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासूनच उष्णतेचा पारा चढू लागतो. यावर्षी तर तीव्र दुष्काळी परिस्थितीत सध्या एकीकडे उनाची तीव्रता वाढत असताना दुसरीकडे कधी नव्हे इतका लोकसभेच्या निवडणुकीचाही ज्वर वाढू लागला आहे. गेल्या दहा वर्षात जिल्ह्यातील अंतर्गत गटबाजीमुळे मोहिते-पाटलांना मिळणारे आव्हान आणि त्यांच्या होणाऱ्या खर्चीकरणास राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडूनच मूक संमती मिळत असल्याने मोहिते-पाटलांची घुसमट होत होती. राज्याचे उपमुख्यमंत्रिपद भोगलेल्या मोहिते-पाटलांना अगदी जिल्हा परिषदेमध्ये देखील संघर्ष करावा लागत होता. सर्वात महत्वाचे म्हणजे विजयसिंह यांनी तीन जिल्ह्यांना वरदान ठरू पाहणारी अशी कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना स्वतः उपमुख्यमंत्री असताना मंजूर करून घेतली. पण नंतरच्या काळात केवळ विजयदादांना विरोध करायचा म्हणून या योजनेकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात आले. तेव्हा विजयसिंह यांनी हा प्रश्न थेट जनतेच्या दरबारात नेत तब्बल ७ लाख ३२ हजार ८३७ सह्यांचे निवेदन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिले. तरीही याबाबत आर्थिक कारण सांगून कोणतीही कार्यवाही झाली नाही. तेव्हा विजयसिंह यांनी उजनीतील गाळ व वाळू काढून मिळणाऱ्या निधींतून ही योजना तर पूर्ण होऊ शकतेच  पण राज्य शासनास मोठा निधीही उपलब्ध होऊ शकतो, हे पटवून दिले. पण त्याचीही अनेकांनी खिल्ली उडवली. आता ही योजना स्वपक्षातून पूर्ण होणे शक्य नाही, हे जवळपास निश्चित झाले होते.

दुसरीकडे राजकीय अस्थिरताही वाढू लागली होती. २०१४ च्या निवडणुकीतील विद्यमान खासदारांना उमेदवारी जाहीर होत असताना माढ्याचा सस्पेन्स मात्र विजयसिंह यांचा पत्ता कट करण्यासाठीच वाढविला जातोय, अशी मोहिते-पाटील कार्यकर्त्यांची भावना झाली. त्यामुळे अशा अस्थिर वातावरणात हजारो कार्यकर्त्यांच्या समक्ष रणजितसिंह यांनी भाजपत जाण्याचा निर्णय घेतला. त्यास विजयसिंह यांनी पाठिंबा दिला. आता यापुढे स्थिरीकरण कृष्णा-भीमेचे होणार की मोहिते-पाटलांचे होणार की दोघांचेही होणार हे मात्र येणारा काळच ठरवेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com