Loksabha 2019 : मला साताऱ्यातून उमेदवारी मिळणार : नरेंद्र पाटील

Loksabha 2019 : मला साताऱ्यातून उमेदवारी मिळणार : नरेंद्र पाटील

मुंबई : अण्णासाहेबांनी निर्माण केलेला इतिहास आणि सामाजिक कार्य अबाधित आणि अजरामर राहिले पाहिजे. त्यासाठी आपल्या संघटनेची एकजूट आणि माथाडींची शक्ती अभेद्य राहायला हवी. समोर बसलेल्या आमच्या माथाडींच्या या अफाट जनसमुदायाने आम्हाला यापुढेही असाच पाठिंबा द्यावा. कारण तुम्हीच आमचे कवच आहात. अण्णासाहेबांनी स्थापन केलेल्या माथाडी कामगारांच्या संस्था म्हणजेच पतपेढी, ग्राहक सोसायटी, रुग्णालय या वास्तूंचा आपण वारसा जपायला पाहिजे. हे करताना अण्णासाहेबांच्या संघटनेला दुहीची दृष्ट कधीच लागू नये. हीच खरी अण्णासाहेबांच्या 37 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रध्दांजली अर्पण करु, असे बहुमुल्य उद्गार माथाडी संघटनेचे सरचिटणीस व अण्णासाहेब पाटील अर्थिक, मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी काढले. तसेच लोकसभा निवडणुकीत मला शिवसेनेकडून उमेदवारी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

माथाडी कामगारांचे आराध्यदैवत स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांची 37 वी पुण्यतिथी साजरी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने एपीएमसी कांदा-बटाटा मार्केटमधील लिलावगृह येथे आयोजित केलेल्या माथाडी कामगारांच्या भव्य मेळाव्यात नरेंद्र पाटील बोलत होते. 

ते म्हणाले, की प्रतिकूल परिस्थितीत दारुखाना येथील दहा बाय दहाच्या खोलीत अण्णासाहेबांनी स्थापन केलेल्या संघटनेचे आज भव्य वटवृक्षात रुपांतर झाले. हे वैभव आणि हा भव्य वटवृक्ष असाच दिमाखाने डौलत राहिला पाहिजे. अण्णासाहेबांच्या अफाट माथाडी शक्तीमुळे मी स्वत: आणि शशिकांत शिंदे आमदार झाले. शिंदे मंत्रीही झाले मी आता अण्णासाहेब पाटील अर्थिक विकास मागास महामंडळाचा अध्यक्ष आहे. या लोकसभा निवडणुकीत मला सातारा लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे उमेदवारी जाहीर होणार आहे. या संघटनेतील प्रत्येकाला मी सांगेन की, तुम्ही कोणत्याही पक्षात असा पण संघटनेला बाधा येईल असे वर्तन करु नका. प्रत्येकाने आपली राजकीय वाटचाल जरुर करावी. पण त्याचे पडसाद संघटनेमध्ये उमटू नयेत, याची दखल घ्यावी.

तसेच ते पुढे म्हणाले, की माझ्या लोकसभा उमेदवारीवर शिक्कामोर्बत झाल्यानंतर आपण सर्वांनी मला सहकार्य करावे. अण्णासाहेबांचा सुपूत्र म्हणून मला मतदान करुन लोकसभेत खासदार म्हणून जाण्याची संधी द्यावी. 

शशिकांत शिंदे म्हणाले, की अण्णासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही मंडळी संघटनेची वेगाने वाटचाल करीत आहोत. त्यांचा वारसा जपण्यासाठी आपण सतर्क राहिले पाहिजे. वेळोवेळी सत्तेत आलेल्या सरकारच्या धोरणांनुसार कायदे बदलत असतात. या सरकारच्या काळात महाराष्ट्रात माथाडी कामगार कायदा बदलण्याचा प्रयत्न केला गेला, बाजार समिती नियमनमुक्त, माथाडी कामगारांना जाचक असे विविध सरकारी अध्यादेश काढण्यात आले. आपण त्याविरुध्द तीव्र आंदोलने छेडली व सरकारला माथाडी कामगारांविरुध्द काढलेले अध्यादेश मागे घेण्यास भाग पाडले. बाजार समिती नियमनमुक्त असे ठराव पासही झाले, पण हा ठराव आपण विधानपरिषदेत रोखून धरला, आपल्या माथाडी शक्तीचा आणि कै.अण्णासाहेबांच्या माथाडी कामगारांच्या ऐतिहासिक संघर्षाच्या शिकवणुकीचा अभूतपूर्व असा हा विजय आहे.

पुढच्या काळात आपल्यासमोर अनेक आव्हाने, संकटे उभी राहणार आहेत  आणि त्यांना सामोरे जाण्यासाठी आपली अभेद्य एकजूट टिकविणे आणि संघटनेचे अस्तित्व आबाधित ठेवणे ही फार मोठी जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. ती पेलण्यासाठी आपण सज्ज होऊया.

संघटनेचे नेते व कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप यांनी आपल्या स्वागतपर प्रास्ताविक भाषणात या सभेच्या निमित्ताने संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. ते म्हणाले, की काशिनाथ वळवईकर व अण्णासाहेबांच्या दु:खद निधनानंतर संघटनेचा डोलारा शिवाजीराव पाटील, संभाजीराव पाटील यांनी समर्थपणे सांभाळला तर त्यांच्या निधनानंतर नरेंद्र अण्णासाहेब पाटील, शशिकांत शिंदे आणि मी या संघटनेच्या लढाऊ सैनिकांची फळी सांभाळत आहोत. यापुढे संघटनेची वाटचाल उत्तरोत्तर अशीच राहीली पाहिजे, असे ठोस मत त्यांनी व्यक्त केले.

या सभेला श्रीमती वत्सलाताई अण्णासाहेब पाटील (मातोश्री), संयुक्त सरचिटणीस वसंतराव पवार, आनंद पाटील, ऋषिकांत शिंदे, चंद्रकांत पाटील,रविकांत पाटील,सल्लागार सुरेशभाई कोपरकर,कायदेशीर सल्लागार अॅड्.भारती पाटील, खजिनदार गुंगा पाटील, सहखजिनदार भानुदास इंगुळकर आदी पदाधिकारी मान्यवर व तमाम माथाडी कामगार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेक्रेटरी व जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख यांनी केले तर अध्यक्ष एकनाथ जाधव यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com