इंजिनिअरिंगला प्रवेश घेणे झाले सोपे ; दीड लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना होणार फायदा

राजेश कळंबटे
Monday, 12 October 2020

याचा फायदा परराज्यात जाणाऱ्या सुमारे दीड लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना होणार आहे

रत्नागिरी : इंजिनिअरिंग प्रवेशासाठी बारावीच्या किमान गुणांची अट ५ टक्‍क्‍यांनी शिथिल केली आहे. त्यामुळे सीईटीत किमान गुण आणि बारावीला किमान ४५ टक्के गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यालाही प्रवेश दिला जाईल. त्याचा फायदा परराज्यात जाणाऱ्या सुमारे दीड लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना होणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा - अवैध धंद्यामुळे सुसंस्कृत सिंधुदुर्गचा आत्मा दूषित 

येथील शासकीय विश्रामगृहात बोलताना ते म्हणाले की, इंजिनिअरिंग पदवी शिक्षण घेणाऱ्यांना बारावीत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र तसेच गणित (पीसीएम) या तीन विषयांत किमान ४५ टक्के गुण, तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ४० टक्के गुण मिळवणे गरजेचे आहे. पूर्वी ही अट अनुक्रमे ५० व ४५ टक्के होती. नव्या निकषांनुसार पाच टक्‍क्‍यांची अधिक सवलत दिली आहे. याबाबतचे राजपत्र सरकारने प्रसिद्ध केले आहे. कर्नाटकसह इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही ही अट शिथिल करावी, अशी मागणी होती.

गुणवत्तेचा विचार करत ती मान्य केली नव्हती. इंजिनिअरिंगसोबतच औषध निर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट, विधी पाच वर्षे अभ्यासक्रम, बॅचलर इन फाइन आर्ट, बॅचलर ऑफ डिझाइन या अभ्यासक्रमांसाठीच्या बारावीच्या किमान गुणांची अट ५० व ४५ टक्‍क्‍यांवरून अनुक्रमे ४५ व ४० टक्के केली. कमी गुण मिळालेले विद्यार्थी परराज्यात प्रवेश घेतात. त्यामुळे महाराष्ट्रातील खासगी आणि शासकीय कॉलेजमधील सुमारे ६२ हजार पदे रिक्‍त राहत होती. नवीन निकषामुळे परराज्यात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण घटून रिक्‍त राहणाऱ्या ६० टक्‍के जागा भरल्या जातील.

हेही वाचा -  परतीच्या पावसाचा हाहाकार, कोकणाला झोडपले 

‘उमेद’ बंद करणार नाही

‘उमेद’ अभियान बंद करून तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. कर्मचाऱ्यांमध्ये गैरसमज पसरवला जात आहे. उमेदमधून एकाही कर्मचाऱ्याला कमी केले जाणार नाही. उमेदसाठी १०० कोटी गुंतवणुकीची योजना भविष्यात होईल. अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पगार करणारी संस्था बदलली आहे. त्यांचे पगार कमी केलेले नाहीत. राज्यात २ हजार ८५९ कर्मचारी कार्यरत आहेत. शासन निर्णयही जाहीर झाला आहे. उमेदच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेले आंदोलन मागे घेतले जाईल, अशी अपेक्षा सामंत यांनी व्यक्‍त केली.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: admission for engineering students in our state the conditions are soft for admission says uday samant in ratnagiri