मांडवी एक्‍स्प्रेससमोर वटवृक्ष कोसळला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जुलै 2016

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर वीर ते करंजारीदरम्यान मांडवी एक्‍स्प्रेससमोर आज भला मोठा वटवृक्ष कोसळला. मार्गावर काहीतरी पडल्याचे लक्षात आल्यानंतर मोटरमनने सावधगिरी बाळगून गाडी थांबवली. ही घटना दुपारी बाराच्या सुमारास घडली. पावसामुळे प्रवासी दरवाजामध्ये बसलेले नव्हते. त्यामुळे अनर्थ टळला. पाऊण तासानंतर मांडवी एक्‍स्प्रेस रवाना झाली. या प्रकारामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या पाऊण तास उशिराने धावत होत्या.  

सकाळी आठ वाजता सुटणारी मांडवी एक्‍स्प्रेस मडगावकडे येत होती. मुसळधार पाऊस असल्यामुळे गाडीचा वेग कमी होता. वीर स्थानक सोडून गाडी पुढे आल्यानंतर अचानक इंजिनसमोर वडाचे झाड पडले. समोर आलेल्या मोठ्या फांद्या कापत इंजिन धडधडत पुढे गेले. फांद्या डब्यांवर घासत होत्या. खिडक्‍यांसह डब्यांवर फांद्या घासल्याचा आवाज येत होता. वातानुकूलित डब्यातील शौचालयांसह काही ठिकाणच्या काचा फुटल्या. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. दोन ते तीन डब्याच्या खिडक्‍यांमध्ये झाडाच्या फांद्या अडकल्या होत्या. एक्‍स्प्रेसचे मोटरमन राजेंद्र विष्णू यांनी प्रसंगावधान राखून गाडी थांबवली. गाडी थांबल्यानंतर प्रवाशांनी बाहेर उड्या मारल्या. गाडीपुढे वटवृक्ष पडल्याचे लक्षात आल्यावर सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला.
हा प्रकार समजताच कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गाडीतील प्रवाशांची अधिकाऱ्यांनी चौकशी केली. झाडांच्या फांद्या तोडून मार्ग सुरळीत करण्यात आला. तोपर्यंत खेड आणि वीर स्थानकात मागून येणाऱ्या गाड्या थांबवून ठेवण्यात आल्या होत्या.
पावसामुळे दुर्घटना टळली
मांडवी एक्‍स्प्रेसला मडगावकडे जाणाऱ्या प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. अनेक प्रवासी दरवाजात उभे राहतात. मुसळधार पाऊस असल्याने बहुतांश डब्यांचे दरवाजे बंद होते. वेगही कमी असल्याने गाडी थांबविणे शक्‍य झाले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

Web Title: banyan tree fell On exspres Highway in Mandvi