
सुरुवातीच्या काळातील लोकप्रिय मालिकांमध्ये हमखास उल्लेख होणारी ही मालिका आता नव्या ढंगात आणि नव्या पिढीच्या रूपातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालीये.
मुंबई- प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या कल्पनेतून साकारलेला ‘कॉमन मॅन’, कुंदन शाह यांच्यासारखा प्रतिभावंत दिग्दर्शक आणि दूरदर्शन हे माध्यम या तिन्हींच्या एकत्रित प्रयत्नातून १९८८ साली ‘वागळे की दुनिया’ जन्माला आली. पहिल्यांदा सहा भागांसाठीच आलेल्या या मालिकेला अमाप लोकप्रियता मिळाली.मध्यमवर्गीय कुटुंबांतील रोजच्या जगण्याचे पदर उलगडताना मनोरंजनातून मार्मिक भाष्य करणारी ९०च्या दशकातील ‘वागळे की दुनिया’ लवकरच पुन्हा एकदा छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुरुवातीच्या काळातील लोकप्रिय मालिकांमध्ये हमखास उल्लेख होणारी ही मालिका आता नव्या ढंगात आणि नव्या पिढीच्या रूपातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालीये.
हे ही वाचा: 'हसण्यावर नियम नाहीत पण..' मराठी कलाकारांचं नाट्यरसिकांना आवाहन
मध्यमवर्गीयांचा प्रतिनिधी म्हणून आर. के . लक्ष्मण यांचा वागळे अजरामर झाला आहे. वागळेंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अंजन श्रीवास्तव यांना ‘मिस्टर वागळे’ ही प्रतिमा कायमची चिकटली. ‘आजही ती ओळख पुसता आलेली नाही,’ असं सांगणारे अंजन श्रीवास्तव ३२ वर्षांनी पुन्हा एकदा वागळेची भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘सोनी सब’ वाहिनीवर निर्माता-दिग्दर्शक जे.डी.मजेठिया हे ‘वागले की दुनिया- नई पिढी, नये किस्से’ ही मालिका नव्या वर्षांत घेऊन येणार आहेत. नव्या मालिकेत श्रीनिवास आणि राधिका या दाम्पत्याची दोन्ही मुले मनोज आणि राजू मोठी झाली आहेत. एका परदेशात आहे तर दुसरा मुंबईत नोकरी करतो आहे. ही कथा प्रामुख्याने वागळेंच्या मुलाभोवती फिरणार असून अभिनेता सुमीत राघवन चिरंजीव वागळेच्या भूमिकेत दिसणार आहे.
‘कथा वागळेंच्या मुलाची असली तरी मूळ मालिकेतील वागळे दाम्पत्य हे या मालिकेचे मुख्य आकर्षण असणारच ते नसतील तर लोकांना ‘वागळे की दुनिया’ रुचणार नाही,’ असं स्पष्ट मत अंजन श्रीवास्तव यांनी व्यक्त केलं. त्यामुळेच नव्या मालिकेत अंजन श्रीवास्तव आणि भारती आचरेकर हे सुरुवातीला झळकणार आहेत.
अंजन श्रीवास्तव यांनी यानिमित्ताने ‘वागळे की दुनिया’च्या निर्मिती टप्प्यातील अनेक आठवणींना उजाळा दिला. ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ सुरू असतानाही दर सोमवारी ही मालिका पाहण्यासाठी लोक वाट पाहात बसायचे. सहा भाग संपल्यानंतर ही मालिका पुढे का नाही? अशी विचारणा लोकांनी सुरू केली होती, अशी आठवणही श्रीवास्तव यांनी सांगितली.
इतक्या अभ्यासपूर्ण पद्धतीने साकारलेला लक्ष्मण यांचा वागळे पुन्हा नव्या संदर्भासह आणणे ही निर्माता-दिग्दर्शकांसह कलाकार म्हणून आमच्या सगळ्यांवर मोठी जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले. तो चुकीच्या पद्धतीने साकारला गेला तर तो लक्ष्मण यांचा अपमान ठरेल, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
wagle ki duniya to return in new avatar with sumeet raghavan