#SakalForMaharashtra ‘एकत्र येऊया...’साठी सरसावले लाखो हात

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 July 2018

हे अभियान कोणत्याही जातीधर्मापुरते मर्यादित नसून गरजूंना मदत करण्यासाठी सर्वच समाजघटकांनी पुढे यावे, अशी अपेक्षा आहे. 

महाराष्ट्र घडविण्याच्या या कामात आपण काय सहभाग देऊ इच्छिता?  
आमच्यापर्यंत पोचवा #SakalForMaharashtra हा हॅशटॅग वापरून.
ई-मेल कराः  webeditor@esakal.com  
Call Center : 9225800800

राज्यात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘एकत्र येऊया! मार्ग काढूया!!’ या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून आज लाखो हात सरसावले आहेत. विविध क्षेत्रांतील मान्यवर व सामाजिक संस्थांनी या अभियानाला भरभरून प्रतिसाद देऊन, ‘सकाळ माध्यम समूहा’च्या खांद्याला खांदा लावून समाजातील गरजूंना मदत करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या काही निवडक मान्यवरांच्या प्रतिक्रिया सोबत देत आहोत... #SakalForMaharashtra

संकटाच्या पोटात संधी...
आजची अस्वस्थता आणि संकट भीषण आहे, परंतु प्रत्येक संकटाच्या पोटात संधी दडलेली असते. पूर्ण व्यवस्थेचा पट बदलून नवं काही घडवण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना एकत्र आणणे, समूहशक्ती उभी करणे यासाठी मी आणि सह्याद्री परिवार कायम पुढे असू.
- विलास शिंदे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि.

आत्मविश्वास वाढविण्याची गरज
शेती हा विषय केंद्रस्थानी ठेवून  शेतीपूरक व्यवसाय व त्याचे रोल मॉडेल्स काय आहेत, याची जाणीव करून देऊन प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी व्यावसायिक व उद्योजकांचे सहकार्य मिळवता येईल. मी व्यक्तिशः योगदान देण्यास इच्छुक आहे.
- डॉ. व्यंकट मायंदे, माजी कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

राज्यभरात ऊर्जा केंद्रे सुरू व्हावीत
‘सकाळ’ने सुरू केलेले अभियान स्वागतार्ह आहे. देणगी देण्याऐवजी मनुष्यबळ प्रशिक्षित करण्यासाठी आपला अनुभव दुसऱ्याला देणे आवश्‍यक आहे. इंग्रजी व तंत्रज्ञानाचे ज्ञान ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी आयटी क्षेत्रातील लोकांनी पुढे येणे आवश्‍यक आहे. 
- हेरंब कुलकर्णी, शिक्षणतज्ज्ञ

टेलिमेडिसीन हा उपाय
आजही ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा पोचविण्यात मर्यादा येतात. सोयीसुविधांच्या अभावासह येथे मनुष्यबळाचीही कमतरता भासते. त्यावर ‘टेलिमेडिसीन’ हा उपाय आहे. त्यासाठी डॉक्‍टर्स, समाजसेवक आदींची साथ हवी.
- डॉ. अविनाश सुपे, संचालक, प्रमुख पालिका रुग्णालये आणि अधिष्ठाता, केईएम रुग्णालय

कौशल्य विकासावर भर हवा
कौशल्य विकासावर आधारित शिक्षण घेतले नसल्याने नोकरी मिळत नाही. ‘सकाळ’ने बदल घडविण्यासाठी सुरू केलेला उपक्रम निश्‍चितच कौतुकास्पद असून त्यासाठी आमची साथ असेल. 
- मानसिंह पवार, उद्योजक, औरंगाबाद 

जागरूकता हवी
सद्यस्थितीत विद्यार्थ्यांसाठी उपयुक्‍त असे शिक्षणक्रम चालविले जात आहेत. विद्यार्थ्यांमध्ये यासंदर्भात जागरूकता निर्माण केल्यास हेतू साध्य होऊ शकेल. 
- नीलिमाताई पवार,  मविप्र संस्था

कृतीतून शिक्षण
कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाची आखणी करता येईल. बदलांशी जुळवून घेण्यासाठी सक्षम पिढीची गरज आहे. कृतीतून शिक्षण हे महत्त्वाचे ठरणार आहे. 
 - डॉ. एन. एस. उमराणी, प्र-कुलगुरू,  पुणे विद्यापीठ

कमी भांडवलात जास्त उत्पन्न
विविध उद्योगांमध्ये संधी येत आहेत, यापुढे देखील येत राहतील. नावीन्यपूर्ण संकल्पनांवर असंख्य स्टार्टअप तरुणांनी सुरू केले आहे. नवसंशोधनातून कमी भांडवलात जास्त महसुली उत्पन्न देणारे व्यवसाय उभारले जात आहेत. त्यामुळे तरुणांनी व्यवसायाकडे वळले पाहिजे. 
- अनंत सरदेशमुख, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स

महाकॉनद्वारे मार्गदर्शन
क्रेडाईच्या माध्यमातून आम्ही ‘महाकॉन’द्वारे उद्योजकांना त्यांच्या व्यवसायवृद्धी, पूरक व्यवसाय मार्गदर्शन, कामगारांचे कौशल्य प्रशिक्षण देण्याचे काम करत आहोत. प्रामुख्याने महिलांना कौशल्य प्रशिक्षण देत आहोत. जेणेकरून त्या महिला स्वयंरोजगार स्थापन करतील आणि आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होतील.’’  
 - शांतीलाल कटारिया, अध्यक्ष क्रेडाई महाराष्ट्र

वकिलांची गरज
सामाजिक न्याय क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक वकिलांची गरज आहे. जे सामाजिक न्याय क्षेत्रांत काम करू इच्छितात अशा सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार यांना रोजगाराच्या व्यावसायिक संधींबाबत सांगू शकतो आणि त्यांना खूप कमी कालावधीत आर्थिक यश मिळविण्यासाठी मदत करू शकतो.
- अॅड. असीम सरोदे, मुंबई हायकोर्ट

अभिनय क्षेत्रात मदत करणार
प्रत्येकाने आपल्याला चांगली संधी कशी मिळेल यासाठी कायम प्रयत्नशील असले पाहिजे. अभिनयाच्या क्षेत्रात कोणाला काही करायचे असेल तर अभिनयाला पूरक गोष्टी म्हणजेच नृत्य शिकणे किंवा फिटनेस ठेवणे, नवीन भाषा आणि त्याबरोबर स्वतःमध्ये चांगले बदल करत राहणे गरजेचे आहे. 
- प्रिया मराठे, अभिनेत्री

एकत्रित विचार होईल
वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना एकत्र आणून समाजासाठी काम करणे चांगले आहे. या उपक्रमात सहभागी व्हायला नक्कीच आवडेल, त्यासाठी एकत्रितपणे विचार करता येईल. एकत्रितपणे काम केल्यामुळे त्याचा अधिक उपयोग समाजघटकांसाठी होऊ शकतो. 
- मुमताज शेख, समन्वयक, कोरो

उपक्रम काळाची गरज
सद्यस्थिती पाहता ‘सकाळ’चा हा उपक्रम वास्तविकतेला धरून आणि काळाची गरज असलेला आहे. या उपक्रमास माझा पाठिंबा असून, विविध समाजघटकांनी यासाठी एकत्र येणे आवश्‍यक आहे.
- अरुण केदार, छत्रपती पुरस्कार विजेते आणि ज्येष्ठ कॅरम संघटक

मोहीम यशस्वी होईल
सध्या आमचे फाउंडेशन अंबरनाथ परिसरातील गावातून गुणवान खेळाडूंचा शोध घेत आहे. त्यातून आम्हाला राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू गवसले आहेत. ट्रायथलॉन, अॅथलेटिक्‍समध्येही यश लाभत आहे. गावपातळीवरील संस्थांना हाताशी धरून एकमेकांच्या सहकार्याने राज्यस्तरावर ही मोहीम नक्कीच यशस्वी होऊ शकेल. 
- सुशील इनामदार, स्ट्राईडर्स फाऊंडेशन

संबंधित बातम्या :
#SakalForMaharashtra एकत्र येऊया ! मार्ग काढूया !!
#SakalForMaharashtra मी तयार आहे, आपणही पुढे या!​
#SakalForMaharashtra कामगार कौशल्य विकास काळाची गरज: श्रीकांत परांजपे​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #SakalForMaharashtra sakal maharashtra come together