#SakalForMaharashtra समाजासाठी सरसावला समाज

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 29 July 2018

हे अभियान कोणत्याही जातीधर्मापुरते मर्यादित नसून गरजूंना मदत करण्यासाठी सर्वच समाजघटकांनी पुढे यावे, अशी अपेक्षा आहे. 

महाराष्ट्र घडविण्याच्या या कामात आपण काय सहभाग देऊ इच्छिता?  
आमच्यापर्यंत पोचवा #SakalForMaharashtra हा हॅशटॅग वापरून.
ई-मेल कराः  webeditor@esakal.com  
Call Center : 9225800800

मुंबई - महाराष्ट्रातील सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, समाजानेच एकत्र येऊन समस्यांवर मार्ग शोधण्याच्या ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या आवाहनाला राज्याच्या कानाकोपऱ्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

#SakalForMaharashtra

विविध क्षेत्रांतील यशस्वी मान्यवर व सामाजिक संस्थांनी ‘सकाळ’च्या अभियानात शिक्षणासाठी गरजू विद्यार्थ्यांना मदत, तरुणांमधील कौशल्यविकास, तसेच महिलांची आर्थिक सुरक्षा, एकूणच समाजाच्या उभारणीसाठी पैसा, वेळ, तसेच उद्योजकता-व्यावसायिकतेचा कानमंत्र देण्याची तयारी दर्शविली आहे. 

यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यीन), तनिष्का व्यासपीठ, सकाळ रिलिफ फंड, सकाळ सोशल फाउंडेशन, अशा सामाजिक व्यासपीठांच्या धर्तीवरील नव्या अभियानाची घोषणा शनिवारी ‘सकाळ’ माध्यम समूहाने केली. तिचे समाजाच्या सर्वच स्तरांमधून स्वागत होत असून, त्यात विविध क्षेत्रांत यशोगाथा नोंदविणाऱ्या यशस्वी उद्योजक, व्यावसायिकांची संख्या मोठी आहे. स्वयंसेवी संस्थाही योगदानासाठी सरसावल्या आहेत. बहुतेकांनी अभियानात प्रत्यक्ष सहभागी होऊन शिक्षण, नोकरी, कौशल्य विकास, स्टार्टअपस्‌, किफायतशीर शेती, कृषीप्रक्रिया आदींबाबत गरजूंना मार्गदर्शन, प्रत्यक्ष योगदान, गुंतवणुकीची तयारी दर्शविली आहे. विशेषत: हे अभियान कोणत्याही जातिधर्मापुरते मर्यादित न ठेवण्याच्या आणि समाजानेच समाजासाठी एकत्र येण्याच्या, संकटातून मार्ग शोधण्याच्या भूमिकेचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. काहींनी एकीकडे प्रचंड बेरोजगारी आणि दुसरीकडे उद्योग व व्यवसायांमध्ये कुशल मनुष्यबळाची वानवा, असा विरोधाभास नजरेस आणून दिला. त्या पार्श्‍वभूमीवर, ‘सकाळ’चे हे अभियान एकूणच विकासप्रक्रियेत, समाजाच्या उभारणीत मोलाचे ठरेल, अशा प्रतिक्रिया आहेत. महाराष्ट्रात जन्मलेल्या ज्या व्यक्‍तींनी जागतिक पातळीवर कर्तबगारीची पताका फडकवली, त्यांच्या यशोगाथांमधून तरुण पिढीला प्रेरणा मिळेल, असे काहींनी म्हटले आहे.

पारंपरिक पद्धतीचे काम वा रोजगार भविष्यात संपत जातील. परंतु वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे असंख्य नवे रोजगारही निर्माण होतील. त्यासाठी आवश्‍यक मनुष्यबळ तयार होण्यासाठी शिक्षण आणि उद्योग क्षेत्राला पुढे यावे लागेल. सरकारी धोरण त्यासाठी अनुकूल करावे लागेल. बदलत्या तंत्रज्ञानाबाबत संशोधन करण्यासाठी उद्योगांना सक्रिय भागीदाराची भूमिका पार पाडावी लागेल. 
- डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ शास्रज्ञ

अभियांत्रिकीमध्ये २० वर्षांपेक्षा जास्त अनुभव असल्याने या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना ‘इंडस्ट्री रेडी’ करण्यासाठी मी काम करू शकतो. ऑटोमोबाईल, हेवी इंजिनिअरिंग, एरोस्पेस आणि कंझ्युमर गुड्‌स या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन करू शकतो. आयटीआय, डिप्लोमा, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना हे उपयुक्त ठरेल. विद्यार्थी काम करण्यास सज्ज असतील किंवा व्यवसायही सुरू करता येईल. 
- रविकिरण केसरकर, संचालक, अभियांत्रिकी सेवा, सिंटेल

मला कॉर्पोरेट क्षेत्रातील १४ वर्षांचा अनुभव आहे. पुणे आणि परिसरात सध्या मी तीन शाळा चालवित आहे. या उपक्रमासाठी योगदान देण्याची तयारी आहे.
- दुर्गादास डहाळे, संचालक, वसंत वेलफेअर फाउंडेशन

विद्यार्थ्यांनी स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. सेवाक्षेत्रात भरपूर संधी उपलब्ध आहेत. रोजगार आणि रोजगारनिर्मितीसाठी याचा उपयोग करता येऊ शकतो.
- डॉ. गिरीश तेलंग, मनुष्यबळ सल्लागार

संबंधित बातम्या :
#SakalForMaharashtra एकत्र येऊया ! मार्ग काढूया !!
#SakalForMaharashtra मी तयार आहे, आपणही पुढे या!​
#SakalForMaharashtra कामगार कौशल्य विकास काळाची गरज: श्रीकांत परांजपे
#SakalForMaharashtra ‘एकत्र येऊया...’साठी सरसावले लाखो हात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #SakalForMaharashtra sakal maharashtra come together