डाळ बट्टी श्रावणातील चवदार डिश ! 

संतोष विंचू ः सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

येवला (नाशिक) : खवय्यांची चवदार डिश बनलीयं डाळ बट्टी. मूळचा राजस्थानमधील असलेला खाद्यपदार्थ आता खानदेश, मराठवाडा अन्‌ नाशिक शहर-जिल्ह्यातील खवय्यांच्या जिभेवर रेंगाळू लागलायं. श्रावणातील शाकाहाराने या डिशला बरकत आणलीयं. 

येवला (नाशिक) : खवय्यांची चवदार डिश बनलीयं डाळ बट्टी. मूळचा राजस्थानमधील असलेला खाद्यपदार्थ आता खानदेश, मराठवाडा अन्‌ नाशिक शहर-जिल्ह्यातील खवय्यांच्या जिभेवर रेंगाळू लागलायं. श्रावणातील शाकाहाराने या डिशला बरकत आणलीयं. 
व्रत-वैकल्यांची आणि सणांची रेलचेल असलेल्या श्रावणात जवळपास 80 टक्‍क्‍यांपर्यंत लोक मांसाहार करत नाहीत. त्यामुळे चवदार डाळ-बट्टीची "क्रेझ' वाढली आहे. हॉटेलमधून एरव्ही मांसाहार करणाऱ्या खवय्यांकडून या डिशची फर्माइश होवू लागली आहे. चांदवड, नांदगाव, येवला या भागात बट्टीला सर्वाधिक मागणी आहे. त्याखालोखाल नाशिकसह इतर भागातही चवदार पदार्थ म्हणून वेगवेगळ्या निमित्ताने बट्टी जेवणाच्या पंक्तींमध्ये पाहावयास मिळते. जिल्ह्यातील मारवाडी व गुजराथी समाजामध्ये या डिशला विशेष पसंती मिळत आहे. मराठवाड्यातही त्याची वेगळी ओळख आहे. खानदेशात बट्टी लोकप्रिय आहे. या भागात रोडगा म्हणूनही त्याची ओळख असून भाजून व तूप लावून ती बनवली जाते. 

महाप्रसादात लक्षवेधी "मेनू' 
श्रावण मासामध्ये सत्यनारायण पूजा आणि नवसपूर्ती केली जाते. त्यानिमित्ताने अन्नदान केले जाते. विशेषतः शनि महाराजांच्या नस्तनपूरसह महादेवाच्या मंदिरात अनेक जण अन्नदानासाठी बट्टीला प्राधान्य देतात. शिवाय पारायणे व इतर धार्मिक कार्यक्रमात घरगुती महाप्रसादासाठी बट्टी बनवली जाते. श्रावणाला सुरवात होताच, शहरातील हॉटेलमधून डाळ बट्टीचे फलक झळकू लागले आहेत. शंभर ते दीडशे रुपयांमध्ये या डिशचा आस्वाद घेतला जातो. त्यासोबत वरणासह तूप, वांग्याचे भरीत, अळूची भाजी, बटाटा चटणी अथवा ठेचा दिला जातो. खानदेश, मराठवाडयासह जिल्ह्याच्या महामार्गालगतच्या राजस्थानी धाब्यावर स्पेशल बट्टी वर्षभर मिळते. वैजापूर (ता.औरंगाबाद) येथे स्वामी समर्थ भोजनालय बट्टीसाठी प्रसिद्ध असून येवला, नांदगावसह इतर ठिकाणाहून अनेक खवय्ये त्याचा आस्वाद घेण्यासाठी इथे जातात. 

बट्टीची "रेसिपी' 
गव्हाचे पीठ रवेदार दळून घेतात. काही जण त्यात मका, रवा टाकतात. सर्व साहित्य मिसळून ते चपातीच्या पीठासारखे मळून घेतले जाते. मुरण्यासाठी 10 ते 15 मिनिटे ठेवले जाते. त्यानंतर लाडूसारखे गोळे केले जातात. गोळे पाण्यात ठेऊन 10 मिनिटे वाफवून घेतले जातात. ते थंड झाल्यावर चार भागात कापून तेलात तळून घेतात. नंतर ते चुरून म्हणजेच बारीक करून वरणासोबत खालले जातात. त्यात गावरान तूप टाकल्यावर चव अजून बहरते. अंबट-गोड वरण केले जाते. तसेच तुरीच्या डाळीला आवडीनुसार फोडणी करून त्यासोबत खातात. 

डाळ-बट्टीची मागणी मोठी आहे. मी अनेक वर्षांपासून गुरुवारी व रविवारी बट्टी बनवतो. चवदार पदार्थ असल्याने परगावचे प्रवाशी खास बट्टी खाण्यासाठी येतात. सध्या श्रावण सुरु असल्याने मागणीत दुप्पटीने वाढ झाली आहे. 
-विक्रम पवार (हॉटेल व्यावसायिक, येवला) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal News Food

फोटो गॅलरी