किल्लारीतील प्रलयानंतर 87 वेळा झाला भूकंप

किल्लारीतील प्रलयानंतर 87 वेळा झाला भूकंप

लातूर : किल्लारीतील महाप्रलयकारी भूकंपानंतर या परिसरासह लातूर जिल्ह्यात सौम्य स्वरूपाचे भूकंपाचे तब्बल 87 धक्के बसल्याची नोंद लातूरमधील भूकंप वेधशाळेत झाली आहे. महाराष्ट्राच्या कुठल्याही भागात भूकंपाचे इतके धक्के बसले नसतील, इतके धक्के लातूर जिल्ह्यात गेल्या 19 वर्षात बसले आहेत, असे या आकडेवारीवरून वेधशाळेने स्पष्ट केले आहे.

किल्लारी आणि परिसरात झालेल्या महाभयंकर भूकंपाला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. पण भूकंपाचे भय अजूनही कमी झाले नाही. कधी भूगर्भातून येणारे गूढ आवाज तर कधी सौम्य बसणारे भूकंपाचे धक्के यामुळे आजही प्रलयकारी भूकंपाच्या आठवणी ताज्या होतात. या भागातील भूकंपाची तीव्रता समजावी म्हणून 30 सप्टेंबर 1993 च्या घटनेनंतर लातूरमध्ये भूकंप वेधशाळा उभारण्यात आली. तेथे 1999 पासूनच्या भूकंपाच्या नोंदी पहायला मिळत आहेत. जगभरातील भूकंपाची नोंद येथे होते. पण, लातूरपासून जवळपास 100 किलोमिटरच्या परिसरात 1999 पासून भूकंपाचे 87 सौम्य धक्के बसले आहेत. हे धक्के 0.9 ते 4.8 रिश्टर स्केल पर्यंतचे आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

चालू वर्षात चारवेळा भूकंप
वेधशाळा सुरु झाल्यापासून सर्वात जास्त भूकंप 2007 मध्ये झाले आहेत. या वर्षी 15 वेळा भूकंप झाल्याची नोंद आहे. 1999 मध्ये 11 वेळा तर 2005 मध्ये 10वेळा भूकंप झाला आहे. त्यानंतर इतर वर्षात 1 ते 6 वेळा भूकंप झाल्याची नोंद आहे. चालू वर्षात आतापर्यंत चारवेळा भूकंप झाला आहे. 14 जानेवारी 2018 (1.5), 1 फेबुवारी 2018 (3.3), 22 फेब्रुवारी 2018 (1.9), 13 सप्टेंबर 2018 (2.5) या तारखांना ही नोंद झाली आहे. हे भूकंपाचे जाणवणारे सौम्य आणि मध्यम स्वरूपाचे धक्के असल्याने कुठलीही हानी झाली नाही.

भूकंपाच्या माहितीसाठी हेल्पलाईन
-02382- 221490

भूकंपावेळी घ्यायची काळजी
- भूकंपाची जाणीव होताच शक्य तितक्या लवकर मोकळ्या मैदानात जाण्याचा प्रयत्न करा.
- घरातील वृद्ध, अपंग, मुले यांना मोकळ्या मैदानात घेऊन जा.
- आसपास उंच झाडे, इमारती, विजेच्या तारा, खांब नाहीत याची खात्री करा.
- घरातील विजेची उपकरणे बंद करून ठेवा. स्टोव्ह, गॅस बंद करा.
- डोंगराळ किंवा उंच परिसर असेल तर घरंगळत येणाऱ्या दगडांपासून सावध राहा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com