Vidhansabha 2019 : आंबेडकरी लेखक, कलावंत 'आघाडी'सोबत

माधव इतबारे
शनिवार, 14 सप्टेंबर 2019


विधानसभा निवडणूक : युतीला रोखण्यासाठी औरंगाबादेत चिंतन 

औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप-शिवसेनेने विरोधी पक्ष नेस्तनाबूत करण्याची अनैतिक मोहीम उभारली आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी विरोधी पक्षही गरजेचा आहे. त्यामुळे जातीयवादी भाजप-शिवसेनेला रोखण्यासाठी आता आंबेडकरी लेखक, कलावंत, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मदतीसाठी पुढे आले आहेत, असे 'आयुष्य नांगरताना'कार हेमंतकुमार कांबळे यांनी आज (ता. 14) सांगितले. 

आंबेडकरी लेखक, कलावंतांची आज शहरात चिंतन बैठक घेण्यात आली. त्यानंतर पत्रकारांसोबत बोलताना श्री. कांबळे पुढे म्हणाले, विरोधक संपला तर लोकशाहीचे रूपांतर हुकूमशाहीमध्ये होईल आणि सत्तेत बसलेल्या प्रस्थापितांचे मनू प्रणीत राज्य आणण्याचे स्वप्न साकार होईल. या पार्श्वभूमीवर युतीचा पराभव करण्यासाठी आंबेडकरी लेखक, कवी, विचारवंतांनी मैदानात उतरणे गरजेचे आहे. यासंदर्भात शनिवारी झालेल्या कार्यशाळेत मंथन करण्यात आले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरुण दादा आळणे (नांदेड) यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रसिद्ध लेखक आंबेडकरी विचारवंत दशरथ मडावी यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. यावेळी आंबेडकरी समाजाने कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीला सहकार्य करावे, असा निर्णय घेण्यात आला. आघाडीने आंबेडकरी समाजासह इतर वंचित समाजाला पर्याप्त प्रतिनिधी द्यावे यावरही एकमत झाले. बैठकीला लेखक सुदाम मगर, प्रा. प्रदीप इंगोले, डॉ. रमेश जनबंधू, प्रा. डॉ. अनिल काळबांडे, सुभाष कुलसंगे, विजय मालखेडे उपस्थित होते. 

...म्हणून आघाडीला पाठिंबा 
सध्या राज्यात चार प्रमुख पक्ष नेतृत्व करत आहेत. भाजप सरकारने मोठमोठी आश्‍वासने दिली. मात्र प्रत्यक्षात काहीच झाले नाही. युवकांना रोजगार तर मिळाला नाही मात्र मंदीमुळे नोकऱ्या जात आहेत. आरक्षणासंदर्भात मुद्दाम वादग्रस्त विधाने केली जात आहेत. काश्‍मीरमधील 370 कलम हटविताना लोकशाहीचा गळा घोटण्यात आला. त्यामुळेच युतीला विरोध असून, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ambedkari writers, artists support Congress-NCP