नांदेड : अशोक चव्हाण लाख मतांनी आघाडीवर, पण निकाल का लटकलाय? । Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 October 2019

सध्या काही तांत्रिक कारणामुळे तीन ईव्हीएम मशीन चालत नसल्याने मतमाेजणी प्रक्रीयेत अडथळा निर्माण झाला आहे. व्हीव्हीपॅटची सरमिसळ केल्यावर निकाल घाेषित हाेईल.

नांदेड : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची निकाल हाती यायला सुरवात झाली असून, राज्यात लक्षवेधी ठरलेल्या भोकर मतदारसंघात कॉॅंग्रेसचे ज्येष्ठ नेेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण तब्बल सव्वा लाख मतांनी आघाडीवर आहेत. सध्या काही तांत्रिक कारणामुळे तीन ईव्हीएम मशीन चालत नसल्याने मतमाेजणी प्रक्रीयेत अडथळा निर्माण झाला आहे. व्हीव्हीपॅटची सरमिसळ केल्यावर निकाल घाेषित हाेईल.

चव्हाण यांना २२ व्या फेरीअखेर त्यांना एक लाख ६७ हजार २३८ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे बापूसाहेब गोरठेकर यांना ४१ हजार ९२९ मते मिळाली.

पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत अशोकरावांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी या मतदारसंघात लक्ष केंद्रित केले होते. तर त्यांचे राजकीय विरोधक व लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभूत केलेले भाजपचे खासदार प्रताप चिखलीकर यांनी भोकर मतदारसंघात माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांना उभे करून अशोकरावांसमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला होता.

क्लिक करा - या कारणांमुळे झाला पंकजा मुंडे यांचा पराभव

मात्र, मतदारांनी हे प्रयत्न फोल ठरवून आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी पुन्हा एकदा अशोक चव्हाणांच्या पारड्यात मते टाकली. त्यामुळे लोकसभेत झालेला पराभव अशोकरावांनी पुसून काढला आहे. त्यांच्या विजयाची चाहूल लागताच शिवाजीनगर भागातील त्यांच्या घरासमोर कार्यकर्ते जमू लागले. तर काही उत्स्फूर्त कार्यकर्त्यांनी त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन करणारे बॅनर्स झळकावले.

नांदेड जिल्ह्यातील स्थिती दृष्टिक्षेपात

  • हदगाव मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या लढतीत कॉॅंग्रेसचे माधवराव पाटील जवळगावकर यांनी अपक्ष व शिवसेनेचे बंडखोर उमेदवार बाबूराव पाटील कोहळीकर यांना केवळ ७०० मतांनी पराभूत केल्याचे समजते. येथे शिवसेनेचे विद्यमान आमदार नागेश पाटील आष्टीकर यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले.
  • नांदेड - उत्तर मतदारसंघात कॉॅंग्रेसचे माजी मंत्री व अशोकरावांचे खंदेसमर्थक डी. पी. सावंत हे पराभवाच्या छायेत आहेत. येथे शिवसेनेचे अत्यंत नवखे उमेदवार बालाजी कल्याणकर जायंट कीलर ठरण्याची शक्यता अाहे. १२ व्या फेरीअखेर कल्याणकर १२ हजार ३५३ मतांनी आघाडीवर होते. या ठिकाणी वंचितचे उमेदवार मुकूंद चावरे यांनी घेतलेली मते डी. पी. सावंतांना पराभूत करून जाणार, अशी चिन्हे आहेत.
  • नांदेड - दक्षिण मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत होत आहे. येथे कॉॅंग्रेसचे माेहन हंबर्डे यांना अकराव्या फेरीअखेर एक हजार ५३५ मतांची आघाडी आहे. दुसऱ्या क्रमांकावर अपक्ष व भाजपचे बंडखोर दिलीप कंदकुर्ते व तिसऱ्या क्रमांकावर शिवसेनेच्या राजश्री पाटील आहेत.
  • मुखेड मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार डॉ. तुषार राठोड हे तेविसाव्या फेरीअखेर ३० हजार ८०९ मतांनी आघाडीवर आहेत.
  • नायगाव मतदारसंघात चुरशीच्या लढतीत भाजपचे राजेश पवार यांनी चोविसाव्या फेरीअखेर ५३ हजार ५०७ मतांची आघाडी घेतली. येथे त्यांची लढत कॉॅंग्रेसचे विद्यमान आमदार वसंत चव्हाण यांच्याबरोबर आहे. या मतदारसंघात वसंत चव्हाण तब्बल दोन वेळा निवडून आले होते. गेल्या वेळी राजेश पवार यांचा विजय थोडक्यात हुकला होता. या मतदारसंघातही वंचितचे उमेदवार मारोतराव कवळे गुरुजी यांना मिळालेल्या मतांमुळे कॉॅंग्रेसला पराभव पाहावा लागणार आहे.
  • देगलूर मतदारसंघात कॉॅंग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर हे २२ हजार ३३० मतांनी विजयी झाल्याचे समजते. अधिकृत घोषणा बाकी आहे. येथे शिवसेनेचे विद्यमान आमदार सुभाष साबणे यांना पराभव पत्कारावा लागणार आहे.
  • लोहा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार व भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे मेहुणे श्‍यामसुंदर शिंदे हे बाराव्या फेरीअखेर ४२ हजार १३३ मतांनी आघाडीवर आहेत.
  • किनवट मतदारसंघात भाजपचे भीमराव केराम व राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार प्रदीप नाईक यांच्यात अत्यंत चुरशीची लढत होत आहे. भीमराव केराम १८ व्या फेरीअखेर ११ हजार मतांनी आघाडीवर आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Nanded trends middle phase Ashok Chavan Leading