आचारसंहितेपूर्वीच 'समृद्धी'चे भूमिपूजन  : एकनाथ शिंदे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 फेब्रुवारी 2019

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे भूमिपूजन लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी येथे दिली.

औरंगाबाद - मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे भूमिपूजन लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी येथे दिली. शिवाय, एकाच वेळी औरंगाबाद, मुंबई आणि नागपूर अशा ठिकाणी भूमिपूजन करणे शक्‍य होईल, असेही त्यांनी सांगितले.

 जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (ता. दोन) जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ""समृद्धीसाठी भूसंपादनाचे काम पूर्णत्वास गेले आहे. त्यामुळे लवकरच भूमिपूजन होईल. जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाने भरीव निधीची तरतूद केलेली आहे. जनसुनावणी होऊन जिल्ह्याच्या विकासासाठी निर्णय घेण्यात येतील.'' 

""जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांसाठी पात्र लाभार्थींनी बॅंकांमध्ये कर्ज प्रस्ताव दाखल केले आहेत. संबंधित कर्ज प्रस्तावांवर तत्काळ कार्यवाही करून 31 मार्चपूर्वी संपूर्ण कर्ज प्रस्ताव मार्गी लावावेत. जिल्ह्यात महावितरणच्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप आहेत. त्याबाबत ऊर्जामंत्री, मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करणार आहे,'' असेही त्यांनी सांगितले. 

बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, आमदार सुभाष झांबड, प्रशांत बंब, संदीपान भुमरे, भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, विकास जैन आदींची उपस्थिती होती. 
 

घाटीतील चुकीच्या कामांची चौकशी 
आमदार इम्तियाज जलील यांनी घाटी रुग्णालयात गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप केला. मागील दहा वर्षांपासून एकच ठेकेदार काम करीत आहे. याबाबत चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर श्री. शिंदे यांनी संबंधित कामे चुकीची आढळली तर याबाबत चौकशी करण्यात येईल, असे उत्तर दिले. 
 

जिल्ह्याच्या विकासासाठी निधीचे नियोजन 
2019-20 च्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेकरिता 258.02 कोटींच्या वित्तीय मर्यादेत आराखडा तयार करण्याबाबत शासनाकडून सूचना होत्या. शासनाच्या सूचनांनुसार तरतूद केली आहे. प्रारूप आराखड्यात गाभा व बिगरगाभा क्षेत्रासाठी कमाल आर्थिक मर्यादेनुसार 258.02 कोटी तसेच 310 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. 
 

Web Title: Nagpur-Mumbai samruddhi highway latest News