महावितरणच्या 47 हजार ग्राहकांनी नाकारले छापील बिल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

महावितरणच्या "गो-ग्रीन' या योजनेस वीजग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. मागील तीन महिन्यांत राज्यातील 47 हजारांहून अधिक ग्राहकांनी तर औरंगाबाद परिमंडलातील अडीच हजारांहून अधिक ग्राहकांनी या सवलतीचा लाभ घेतला आहे. 

औरंगाबाद - महावितरणच्या "गो-ग्रीन' या योजनेस वीजग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. मागील तीन महिन्यांत राज्यातील 47 हजारांहून अधिक ग्राहकांनी तर औरंगाबाद परिमंडलातील अडीच हजारांहून अधिक ग्राहकांनी या सवलतीचा लाभ घेतला आहे. 

राज्यात 47 हजार 193 ग्राहकांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे. औरंगाबाद परिमंडलात 2,580 ग्राहकांनी गो-ग्रीनसाठी नोंदणी केली आहे. त्यात औरंगाबाद शहर मंडलातील 1,319, औरंगाबाद ग्रामीण मंडलातील 760; तर जालना मंडलातील 501 ग्राहकांचा समावेश आहे. वीजबिल ऑनलाइन पाहण्यासाठी महावितरणने ग्राहकांना मोबाईल ऍप व www.mahadiscom.in या संकेतस्थळावर विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या सर्व सुविधा उपलब्ध असतानाही महावितरणतर्फे ग्राहकांना छापील वीजबिलही उपलब्ध करून देण्यात येते; परंतु जे ग्राहक "गो-ग्रीन' सुविधेचा पर्याय निवडतात, अशा ग्राहकांना छापील बिलाऐवजी ई-मेल व एसएमएसद्वारे वीजबिल उपलब्ध करून दिले जाते. अशा सर्व ग्राहकांना 1 डिसेंबर 2018 पासून प्रतिबिल दहा रुपये सवलत दिली जात आहे. 
 
अशी करा नोंदणी 
"गो-ग्रीन'चा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी आपल्या वीजबिलावरील "गो-ग्रीन' क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल ऍपवर अथवा https://consumerinfo.mahadiscom.in/gogreen.php या लिंकवर करावी. सदर लिंकवर ग्राहक क्रमांकासह चालू महिन्याच्या छापील वीजबिलावर असलेला जीजीएन (गो-ग्रीन नंबर) व ई-मेल नोंदवावा. ग्राहकाला त्याच्या ई-मेलवर कन्फर्मेशन लिंक पाठवण्यात येईल. या लिंकवर क्‍लिक केल्यावर ग्रो-ग्रीनची नोंदणी पूर्ण होईल. "गो-ग्रीन'चा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना तातडीने वीजबिल मिळणार असून, वीजबिलाचे जतन करता येणार आहे. "गो-ग्रीन'चा पर्याय पर्यावरण संवर्धनालाही हातभार लावणारा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वीजग्राहकांनी कागदविरहित या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. 
 

Web Title: news about Go-green scheme