"फ्रॅंचाईजी'ला मिळतेय नवव्यावसायिकांची पसंती 

अभिजित हिरप - सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद - मराठवाड्यात गेल्या दहा-पंधरा वर्षांत सुधारणांचे वारे जोमाने वाहिले. त्यामुळे उद्योग, व्यवसाय, ग्राहकांची गरज आणि पसंतीमध्येही मोठ्या प्रमाणात बदल झाले. आता स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्यापेक्षा उत्पादन, विपणन, वितरण आणि सेवासुविधा दिल्या जात असल्यामुळे फ्रॅंचाईजी पद्धतीला अधिक प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये फूड, क्‍लॉथ आणि एज्युकेशन क्षेत्रातील तीनशे ते साडेतीनशे फ्रॅंचाईजी असल्याचा अंदाज आहे. 

अशी असते कार्यपद्धती 

औरंगाबाद - मराठवाड्यात गेल्या दहा-पंधरा वर्षांत सुधारणांचे वारे जोमाने वाहिले. त्यामुळे उद्योग, व्यवसाय, ग्राहकांची गरज आणि पसंतीमध्येही मोठ्या प्रमाणात बदल झाले. आता स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्यापेक्षा उत्पादन, विपणन, वितरण आणि सेवासुविधा दिल्या जात असल्यामुळे फ्रॅंचाईजी पद्धतीला अधिक प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये फूड, क्‍लॉथ आणि एज्युकेशन क्षेत्रातील तीनशे ते साडेतीनशे फ्रॅंचाईजी असल्याचा अंदाज आहे. 

अशी असते कार्यपद्धती 

कंपनीचे नाव, ब्रॅंड, लोगो, मार्केट व्हॅल्यूचा वापर करून भागीदारमध्ये होणाऱ्या व्यवसायाला फ्रॅंचाईजी म्हटले जाते. जगविख्यात ते राज्यातील प्रसिद्ध कंपन्यांची उत्पादने फ्रॅंचाईजीखाली विकता येऊ लागली. जितक्‍या अधिक फ्रॅंचाईजी तितका अधिक व्यवसाय हे सूत्र. त्यामुळे पिझ्झा आणि कॉफीसारख्या कंपन्यांची झेप न्यूयॉर्कपासून मराठवाड्यातील खेड्यांपर्यंत पोचली. मात्र, या फ्रॅंचाईजीचे कामकाज वैयक्‍तिक व्यवसायापेक्षा अत्यंत निराळे आहे. 

यामध्ये एक पॅरेंट कंपनी अर्थातच फ्रॅंचाईजर असतो. त्याच्याकडून ए, बी आणि सी अशा तीन पद्धतीने फ्रॅंचाईजी दिली जाते. प्रत्येकाला वेगवेगळ्या दराप्रमाणे वेगवेगळे अधिकार, सुविधा प्रदान केलेल्या असतात. एकाप्रकारे फ्रॅंचाईजरकडून फ्रॅंचाईजीधारकाला उत्पादन, सेवा, ट्रेडमार्क आणि तंत्रज्ञान आदी वापरण्याची मुभा दिली जाते. त्याबदल्यात फ्रॅंचाईजर आणि फ्रॅंचाईजीधारकांमध्ये लेखी करार करून ठेव व फीस आकारली जाते. 

करारामध्ये या बाबी जरूर तपासा 

फ्रॅंचाईजर आणि फ्रॅंचाईजी यांच्याबद्दल प्राथमिक माहिती 

नियुक्‍तिपत्र आणि परवाना 

फ्रॅंचाईजीचे क्षेत्र, विकास आणि देखभाल 

प्रोप्रायटरी मार्क अथवा ट्रेडमार्कचा वापर 

ऑपरेशन आणि क्‍वालिटी स्टॅंडर्ड 

फ्रॅंचाईजरकडून दिले जाणारे ट्रेनिंग 

फ्रॅंचाईजी लायसन्स फी 

मार्केटिंग ऍसिस्टन्स 

नियम व अटी, फ्रॅंचाईजीचा कालावधी, रिन्युवल आदी 

ब्रॅंड बिल्डिंग 

स्वतंत्र व्यवसाय उभा करून त्याची जाहिरात करण्यापेक्षा फ्रॅंचाईजी असल्याचा फायदा मिळतो. मोठ्या प्रमाणात नेटवर्क असल्याने जाहिरातीचा खर्च विभागला जातो. त्यामुळे ब्रॅंडचा आपोआपच फायदा होतो. 

फ्रॅंचाईजीचे फायदे 

फ्रॅंचाईजी सुरू करण्यासाठी तुम्ही त्या क्षेत्रातील तज्ज्ञ असण्याची आवश्‍यकता नाही. फ्रॅंचाईजरतर्फे तुम्हाला याबाबत पुरेपूर प्रशिक्षण दिले जाते. 

वैयक्‍तिक व्यवसाय सुरू करून तो चालविण्यापेक्षा फ्रॅंचाईजीच्या यशाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे व्यवसायाचा धोकाही टळतो. 

फ्रॅंचाईजीचे मालक म्हणून तुम्हाला तुमचा व्यवसाय स्वतंत्र चालविण्याचे सुख अनुभवू शकता. 

फ्रॅंचाईजरचे असंख्य बॅंका आणि वित्तीय संस्थांशी करार असतो. त्यामुळे फ्रॅंचाईजी सुरू करताना कर्जसुविधा मिळणेही सोपे जाते. 

दहा हजार ते पाच कोटी 

आजघडीला दहा हजारांपेक्षा अधिक कंपन्या फ्रॅंचाईजर म्हणून अस्तित्वात आहेत. फ्रॅंचाईजी सुरू करण्यासाठी दहा हजार रुपये ते पाच कोटी रुपयांपर्यंतचे बजेट लागते. त्यामुळे लहान व्यावसायिकांपासून ते मोठ्या गुंतवणूकदारांपर्यंत फ्रॅंचाईजीला प्राधान्य दिले जाते. ब्रॅंड व्हॅल्यूचा फायदा नफा मिळविण्यास होत असल्याने फ्रॅंचाईजीकडे नवव्यावसायिकांचा कल वाढतोय. 

या फ्रॅंचाईजीला मागणी मोठी 

ऍडव्हर्टाइज अँड मीडिया 

ऑटोमोटिव्ह 

हेल्थ अँड ब्यूटी 

बिझनेस सर्व्हिसेस 

डिलर्स अँड डिस्ट्रीब्युटर्स 

एज्युकेशन 

एंटरटेनमेंट 

फॅशन 

फूड अँड बेव्हरेजेस 

होम बेस्ड बिझनेस 

हॉटेल अँड रिसॉर्ट 

मॅन्युफॅक्‍चरिंग 

रिटेल 

""औरंगाबादमध्ये सर्व क्षेत्रांतील तीनशे फ्रॅंचाईजी अस्तित्वात आहे. कंपनीतर्फे फ्रॅंचाईजीधारकाला सपोर्ट मिळत असल्याने व्यवसायातील यश-अपयशाचा गुंता कमी होतो. सध्या आमच्या कंपनीच्या शहरात 12, तर राज्यात 42 फ्रॅंचाईजी आहेत. येत्या काळात फ्रॅंचाईजीला मागणी असेल, यात शंका नाही.'' 

- सुदेश ठोले, व्यवस्थापकीय संचालक, एक्‍झॉटिका कॅफे ट्रीट ओ 

""फ्रॅंचाईजरच्या गुडविलचा फायदा फ्रॅंचाईजीधारकाला होतो, हा सर्वांत मोठा फायदा आहे. आजघडीला लहान-लहान फ्रॅंचाईजींची उलाढाल कोटींच्या घरात आहे. जितके अधिक नेटवर्क तितका मोठा ब्रॅंड, तितकाच मोठा नफा, हे गणित ठरलेले असते. या संकल्पनेचे नवव्यावसायिकांकडून स्वागत होत आहे.'' 

- संदीप नागोरी, अध्यक्ष, सीआयआय 

Web Title: Professional's Choice to Franchise