शरद पवारांच्या आजच्या दौऱ्याने नाशिकच्या राष्ट्रवादीला "बूस्टर डोस'

residential photo
residential photo

नाशिक ः राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार विधानसभा निवडणुकीच्या तयारीनिमित्त सोमवारी (ता. 16) नाशिकमध्ये तळ ठोकणार आहेत. त्यांच्या बैठकींमुळे पक्षाला "बूस्टर डोस' मिळणार आहे. त्याच वेळी तळ्यात-मळ्यात करणाऱ्यांच्या सीमा बंदिस्त होत असताना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या जिल्हाभरातील सक्रियतेची मुहूर्तमेढ रोवली जाईल. 
महाजनादेश यात्रेच्या समारोपासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी (ता. 18) नाशिकमध्ये मोटारसायकल रॅली आणि रोड-शोमध्ये सहभागी होताहेत. गुरुवारी (ता. 19) दुपारी तीनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तपोवनात सभा होत आहे. या दोन्ही कार्यक्रमांच्या माध्यमातून नाशिकमधून भाजपतर्फे आगामी विधानसभा निवडणुकीचा बिगुल फुंकला जाणार आहे. पण तत्पूर्वीच पक्षाला उभारी देण्याच्या दौऱ्याची सुरवात श्री. पवार नाशिकमधून करताहेत. त्यांच्या दौऱ्यामुळे अजूनही मरगळलेल्या अवस्थेत असलेल्या पक्षाला उभारी मिळत असताना राष्ट्रवादीच्या इच्छुकांना कामाला लागण्याचा संदेश मिळण्याची शक्‍यता असल्याने राष्ट्रवादीचे तयारीच्या दृष्टीने एक पाऊल पडणार आहे. 
विधानसभा निवडणुकीच्या कोअर कमिटीच्या पुण्यातील बैठकीस उपस्थित राहून श्री. भुजबळ यांनी शिवबंधनाच्या उठलेल्या वावड्या जमिनीवर आणल्या आहेत. ते स्वतः आपल्या येवला विधानसभा मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. मात्र पक्षाच्या संघटनात्मक बळकटीकरणाच्या दृष्टीने प्रदेशस्तरावरून पावले उचलली गेली नव्हती. परिणामी, श्री. भुजबळ जिल्ह्याच्या राजकारणात नेमके कधी सक्रिय होणार याबद्दलचा प्रश्‍न कार्यकर्त्यांना भेडसावू लागला होता. हा प्रश्‍न श्री. पवार यांच्या दौऱ्याने निकाली निघणार आहे. विधानसभेची निवडणूक कॉंग्रेससोबतच्या आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादीतर्फे लढविण्यात येणार आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे राष्ट्रवादीच्या गोटात उत्साह संचारल्यावर कॉंग्रेसला मदत होणार आहे. 

पक्षांतर चर्चेचा धुरळा बसणार 
श्री. भुजबळ यांच्या पक्षांतराचा विषय मार्गी लागला, तरीही इतर विधानसभा मतदारसंघांतील विद्यमान आमदारांसह विधानसभेसाठी इच्छुक असलेल्यांच्या पक्षांतराच्या चर्चा जिल्हाभर झडताहेत. कुणी शिवसेनेच्या, तर कुणी भाजपच्या वाटेवर असल्याचा सूर चर्चांचा आहे. श्री. पवार यांच्या दौऱ्यामुळे मात्र आमदारांसह इच्छुकांना बैठकीसाठी हजेरी लावावी लागणार असल्याने पक्षांतराच्या चर्चेचा धुरळा खाली बसणार आहे. 

कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांच्या बैठकी 
(नाशिकच्या राष्ट्रवादी भवनातील विधानसभा मतदारसंघनिहाय) 

दुपारी बारा ः बागलाण 
दुपारी साडेबारा ः कळवण-सुरगाणा 
दुपारी एक ः येवला 
दुपारी दीड ः नांदगाव 
दुपारी अडीच ः निफाड 
दुपारी तीन ः दिंडोरी-पेठ 
दुपारी साडेतीन ः देवळाली 
दुपारी चार ः नाशिक पूर्व 
दुपारी साडेचार ः नाशिक पश्‍चिम 
सायंकाळी पाच ः मालेगाव मध्य 
सायंकाळी सव्वापाच ः मालेगाव बाह्य 
सायंकाळी साडेपाच ः चांदवड-देवळा 
सायंकाळी पावणेसहा ः सिन्नर 
सायंकाळी सहा ः नाशिक मध्य 
सायंकाळी सव्वासहा ः इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर 


पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकी होतील. त्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह हितचिंतकांनी उपस्थित राहावे. 
-समीर भुजबळ, माजी खासदार 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com