हातसडी तांदळाची विस्तारतेय बाजारपेठ 

Live Photo
Live Photo

घोटी (नाशिक) ः आरोग्याबद्दलची सजगता शहरवासियांमध्ये वाढू लागल्याने आदिवासींच्या नियमित आहारातील हातसडीच्या तांदळाची बाजारपेठ विस्तारतेयं. कोट्यवधींची खरेदी होऊ लागली आहे. तांदळाला चांगला भाव मिळत असल्याने कृषी विभागातर्फे "नाशिक सेंद्रीय' ब्रॅंडतंर्गत उकळात मुसळाने कांडलेल्या भाताचा समावेश करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. 
मधुमेहाची नाही अन्‌ वजन वाढण्याचाही प्रश्‍न. तुम्ही बिनधास्त खा ! हातसडीचा तांदूळ. आश्‍चर्य वाटले ना तुम्हाला? पण हो ! आदिवासी शेतकरी शेतात पिकवलेला तांदूळ यंत्रांद्वारे पॉलीश न करता घरी कांडून खाण्यासाठी वापरतात. त्यामुळे आरोग्याचे हे प्रश्‍न त्यांना भेडावत नाहीत. उकळातील हा तांदूळ खाण्यासाठी पौष्टीक आहे. यंत्रामध्ये तांदूळ पॉलिश केल्याने फायबर आणि तंतूमय पदार्थ कमी होऊन तांदळाच्या पौष्टिकतेवर परिणाम होतो. हातसडीच्या तांदळामध्ये जीवनसत्व आणि खनिज असल्याने ते शरीरासाठी उपयुक्त ठरतात. दरम्यान, "आत्मा'तर्फे सेंद्रीय शेतमाल उत्पादकांची कंपनी स्थापन करुन "नाशिक सेंद्रीय' ब्रॅंड नोंदणीचे प्रयत्न सुरु आहेत. आदिवासींच्या पारंपारिक शेतीला चालना मिळावी म्हणून त्यातंर्गत हातसडीच्या तांदळाचा समावेश केला जाईल, असे "आत्मा'चे उपसंचालक कैलास शिरसाठ यांनी "सकाळ'ला सांगितले. ते म्हणाले, की हातसडीच्या तांदळाचे तुकडे पडतात. त्यामुळे चोखंदळ ग्राहक हातसडीचा कोणता? अन्‌ दाण्याला तांबूस रंग राहील अशा पद्धतीने एकदा पॉलिश केलेला तांदूळ कोणता? हे बरोबर ओळखतात. 

दिवसाला टनाने होते विक्री 
शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळावी म्हणून "सकाळ'तर्फे नाशिकमध्ये "शेतकऱ्यांचा माल तुमच्या दारात' या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली. "आत्मा'तर्फे हा उपक्रम दरवर्षी राबवण्यात येतो. उपक्रमातंर्गतच्या बाजारपेठेत पेठ, सुरगाणा, दिंडोरी, त्र्यंबकेश्‍वर, इगतपुरी तालुक्‍यातील आदिवासी शेतकऱ्यांचा हाच हातसडीचा तांदूळ दिवसाला टनाने खपतो. याशिवाय अन्नधान्याची विक्री होणाऱ्या शहरातील बाजारपेठेत गृहिणींकडून हातसडीच्या तांदळाला पसंती मिळते. एवढेच नव्हे, तर मुंबई, पनवेल, ठाणे, पुण्यातील बाजारात आदिवासींच्या हातसडीच्या तांदळाची मागणी होत आहे. पॉलिश्‍ड तांदूळ 30 ते 80 रुपये किलो भावाने विकला जात असताना त्याहून पन्नास ते साठ रुपये किलोला अधिक देऊन हातसडीचा तांदूळ खरेदी केला जातो. तांदळासाठी प्रसिद्ध असलेल्या घोटीच्या बाजारातून महिन्याला पाचशे क्विंटल तांदूळ खपतो आहे. 

हातसडीचा तांदूळ आरोग्यास लाभदायक आहे. पूर्ण जीवनसत्त्वे उपयोगात येतात. शिजण्यासाठी वेळ व पाणी अधिक लागतो. थायमीन जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात मिळतात. त्याचे शरीरातून प्रमाण कमी झाल्यास जुलाब होणे, विस्मृती, त्वचेवर बुरशी चढणे असे आजार होतात. म्हणूनच शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्तीला हातसडीचा तांदूळ उपयोगी आहे.
- डॉ. डी. एस. सदावर्ते (वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, घोटी) 

सुशिक्षित शहरवासियांकडून हातसडीच्या तांदळाला चांगली मागणी आहे. मील मधून शुद्ध तांदूळ उपलब्ध होत नाही. आदिवासी महिलांच्या मेहनतीतून केला जाणारा तांदूळ उत्तम असतो. बिरसा मुंडा योजनेतून त्यासाठी शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.'' 
- संजय शेवाळे (कृषी तंत्र अधिकारी, नाशिक) 

आरोग्यासाठी उत्तम व आदिवासी शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देणारा हातसडी तांदळाची मागणी वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रयत्नाला सरकारची साथ मिळत जनजागृतीचा उपक्रम राबवल्यास हातसडीच्या तांदळाच्या उत्पादनाकडील कल वाढीस लागेल.'' 
- गोटू कुमट (राईस मिल असोसिएशनचे सचिव, घोटी) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com