मतदान करा आणि पर्यटनावर मिळवा 25 टक्के सूट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

मुंबई - मतदानाच्या दिवशी मिळणाऱ्या हक्काच्या सुटीचा "सदुपयोग' हा पर्यटनस्थळी मज्जा-मस्ती करण्याकडे अनेकांचा कल असतो. एकूणच पर्यटक मतदारांच्या या वृत्तीत फरक पडावा यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला असून, "मतदान करा आणि एमटीडीसीच्या रिसॉर्टस्‌वर 25 टक्के सूट मिळवा' अशी ऑफरही जाहीर करण्यात आली आहे.

2016-17 या वर्षात राज्यामध्ये नगरपालिका आणि महानगरपालिका यांच्या निवडणुका होत आहेत. अनेक वर्षे मतदान करूनही काहीच फरक पडत नाही, असे सांगत अनेक जण मतदानासाठी मिळालेल्या सुटीत पर्यटनस्थळी जाणेच पसंत करतात. दर वेळी पर्यटनाला चला, असा प्रचार करणाऱ्या एमटीडीसीनेच या संदर्भातील उपाय शोधून काढला आहे.

मतदानाच्या दिवशी पर्यटनाला न जाता आपला सजग नागरिक असल्याचा हक्क बजावा आणि त्यानंतर पर्यटनावर सूट मिळवा, असा फतवाच काढत राज्यातील टुर्स आणि ट्रॅव्हल्सनाही यामध्ये सहभागी करून घेतले. त्यासाठी नुकतीच राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, एमटीडीसीचे महाव्यवस्थापक के. एच. गोविंद राज, व्यवस्थापक स्वाती काळे यांच्यासमवेत हॉटेल ऍण्ड रेस्टॉरन्ट असोसिएशन, टुर ऑपरेटर्स यांची बैठक पार पडली. मतदानाच्या काळात बुकिंग केल्यास त्यांना मतदानाची गळ घालावी. त्याचप्रमाणे मतदानानंतर सूटही द्यावी, असे आवाहन या वेळी करण्यात आले. एमटीडीसीच्या रिसॉर्टवरही मतदान केल्याचे दाखवल्यानंतरच 25 टक्के सूट देण्यात येणार आहे. यानिमित्ताने मतदानाबद्दल जागरूकताही वाढेल आणि पर्यटनाचा विशेष ऑफर्ससहित आनंदही घेता येईल, असा दुहेरी हेतू साध्य होईल, अशी प्रतिक्रिया एमटीडीसीच्या वतीने स्वाती काळे यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: 25 per cent of the vote and get a discount on tourism