एसटीत अधिकाऱ्यांची 30 टक्के पदे रिक्त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

61 अधिकाऱ्यांची सेवानिवृत्ती; एसटीच्या सेवेवर परिणाम होण्याची शक्‍यता 

मुंबई : एसटी महामंडळाची 30 टक्के पदे रिक्त असताना 2019 अखेर ते 2020 दरम्यान वर्ग एक आणि वर्ग दोनचे 61 अधिकारी सेवानिवृत्त होणार आहेत. राज्यात एसटीच्या अनेक विभागांमध्ये आधीच एका अधिकाऱ्याला अधिक पदांचा भार दिला असताना आता, अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे एसटीच्या सेवेवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे.

विभागीय वाहतूक अधिकारी आणि वाहतूक अधीक्षक हे वेगवेगळे पद असले, तरी या दोन्ही पदांचा कारभार एकच अधिकारी सांभाळत असल्याची परिस्थिती मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या विभागांमध्ये आहे. याप्रमाणेच राज्यातील इतर विभागांचीही परिस्थिती आहे. असे असताना आता वर्ग एक आणि वर्ग दोनच्या 61 अधिकाऱ्यांची सेवानिवृत्ती जवळ आली आहे.

एसटीचा कमी पगार, 24 तास सेवा, जबाबदारी जास्त असल्याने उच्च शिक्षण घेणारे उमेदवार एसटीच्या पदांसाठी इच्छुक नसतात. त्यामुळे अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्यामध्येही कार्यरत अधिकाऱ्यांवर कामाचा ताण असल्याने राजीनामा देणाऱ्या अधिकाऱ्यांचीही संख्या मोठी असल्याचे एसटीच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

आगार व्यवस्थापक, विभाग नियंत्रक, यंत्र अभियंता, विभागीय सांख्यिकी अधिकारी, सहायक यंत्र अधिकारी, सहायक भांडार अधिकारी, कार्यशाळा व्यवस्थापक, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी, विभागीय अभियंता, मुख्य कल्याण अधिकारी, मुख्य स्थापत्य अभियंता या पदांवरील अधिकाऱ्यांनी सेवानिवृत्ती घेण्याचे प्रमाण वाढले आहे. 

उत्पन्नाला फटका 
एसटीचे उत्पन्न वाढवण्यासाठी वाहतूक विभागाचे मोठे योगदान असते. या वाहतूक विभागातील निवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांचीही मोठी संख्या आहे. त्यामुळे राज्यातील प्रवासी वाढवण्याच्या धोरणाला फटका बसणार असून, एसटीच्या उत्पन्नावरसुद्धा परिणाम होण्याची शक्‍यता आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 30% of the vacant posts of officers in ST