आघाडी फिसकटल्यात जमा

आघाडी फिसकटल्यात जमा

'फॉर्म्युल्या'वरून चर्चेचे घोडे अडले
मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने कॉंग्रेसवर कुरघोडी करत तीन उमेदवारांची घोषणा केल्यानंतर कॉंग्रेसनेही सहाही जागांवर आज उमेदवारी अर्ज भरले. आघाडीची बोलणी सुरू असताना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने उमेदवार घोषित केल्याने दोन्ही कॉंग्रेसची आघाडी फिसकटल्याचे सध्याचे चित्र आहे. आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची पाच नोव्हेंबरपर्यंत मुदत असल्याने दोन्ही कॉंग्रेसकडून कोणता निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने काल मंगळवारी भंडारा/गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी विद्यमान आमदार राजेंद्र जैन यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र कॉंग्रेसनेही आज शेवटच्या दिवशी प्रफुल्ल अग्रवाल यांना तिकीट दिले. सांगली-सातारा मतदारसंघात शेखर गोरे, तर पुणे मतदारसंघातून अनिल भोसले यांची उमेदवारी राष्ट्रवादीने जाहीर केली. कॉंग्रेसने सातारा-सांगली मतदारसंघावरचा दावा कायम ठेवला होता. माजी मंत्री पतंगराव कदम यांचे बंधू येथून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र राष्ट्रवादीने हा मतदारसंघ सोडण्यास नकार देत उमेदवार जाहीर केल्याने कॉंग्रेसकडूनही मोहनराव कदम यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला. पुण्यातूनही कॉंग्रेसतर्फे संजय जगताप यांनी आज उमेदवारी अर्ज भरला.

यवतमाळ-वाशीममध्ये राष्ट्रवादीचे सध्या संदीप बजोरिया विधान परिषद सदस्य आहेत. मात्र कॉंग्रेसकडे सर्वाधिक मतदान असल्याने यावर कॉंग्रेसने दावा केला होता. राष्ट्रवादीने ही जागा कॉंग्रेसला सोडण्याची तयारी दर्शविली होती. मात्र शेवटपर्यंत कॉंग्रेसचा प्रतिसाद मिळाला नसल्याने राष्ट्रवादीने संदीप बजोरिया यांना उमेदवारी देऊन टाकली.

दरम्यान, जळगावमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसने शेवटच्या क्षणी माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांना उमेदवारी दिल्याने कॉंग्रेस नेते खवळले आहेत. नांदेड मध्ये कॉंग्रेसचे अमर राजूरकर विद्यमान आमदार असले तरी दोन्ही कॉंग्रेसमधील कुरघोडीच्या पार्श्‍वभूमीवर यवतमाळ पॅटर्न नांदेड येथेही राबविण्यात येणार असल्याचा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

या अगोदर कॉंग्रेसने पदवीधरसाठी नाशिक मधून डॉ. सुधीर तांबे तर अमरावती शिक्षक मतदारसंघातून संजय खोडके यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र या मतदारसंघाच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नसताना कॉंग्रेसने चर्चेशिवाय उमेदवार जाहीर केल्याने राष्ट्रवादीचे नेते खवळले आहेत.

सहापैकी पाच जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असताना तीन जागांच्या फॉर्म्युल्याचा प्रश्‍नच येतोच कुठे? विधान परिषद निवडणुकीत आघाडी करण्यासाठी आम्ही कॉंग्रेससोबत अनेकदा चर्चा केली; मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शेवटच्या क्षणी यवतमाळचा निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये कॉंग्रेसला राष्ट्रवादीचा विरोध असेल.
- अजित पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते

राष्ट्रवादी कॉंग्रेसने आडमुठेपणा केल्यामुळे आमचा निर्णय घेण्यास आम्ही मोकळे आहोत. पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करून एक-दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल.
- अशोक चव्हाण, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष

कोण कुठे उभे
भंडारा गोदिया - राजेंद्र जैन- राष्ट्रवादी कॉंग्रेस
प्रफुल्ल अग्रवाल - कॉंग्रेस
पुणे - अनिल भोसले - राष्ट्रवादी कॉंग्रेस
संजय जगताप - कॉंग्रेस
सांगली सातारा - शेखर गोरे - राष्ट्रवादी कॉंग्रेस
मोहनराव कदम - कॉंग्रेस
यवतमाळ - संदीप बजोरिया - राष्ट्रवादी कॉंग्रेस
शंकर बडे - कॉंग्रेस
जळगाव - गुलाबराव देवकर - राष्ट्रवादी कॉंग्रेस
लता छाजेड - कॉंग्रेस
नांदेड - शामसुंदर शिंदे, अपक्ष, मात्र राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळण्याची शक्‍यता
अमर राजूरकर- कॉंग्रेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com