तुमच्याशिवाय असो; परिवर्तन होणारच: फडणवीस

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 जानेवारी 2017

जे बरोबर येतील त्यांच्यासह आणि जे बरोबर येणार नाहीत, त्यांच्याशिवाय; मात्र परिवर्तन तर होईलच. आम्ही पारदर्शकतेच्या दिशेने मार्गक्रमण करण्यास कटिबद्ध आहोत..

मुंबई - मुंबईसह अन्य कोणत्याही महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षासमवेत (भाजप) युती करणार नाही, अशी घोषणा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केल्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत.

शिवसेनेच्या या भूमिकेवर प्रतिक्रिया व्यक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "जे बरोबर येतील त्यांच्याबरोबर, आणि जे बरोबर येणार नाहीत त्यांच्याशिवाय परिवर्तन हे होईलच,' असा इशारा दिला.

"सत्ता हे साध्य नाही; तर विकासाचे साधन आहे. पारदर्शी कारभार हाच आमचा मूलमंत्र आहे. तेव्हा जे बरोबर येतील त्यांच्यासह, आणि जे बरोबर येणार नाहीत, त्यांच्याशिवाय; मात्र परिवर्तन तर होईलच. आम्ही पारदर्शकतेच्या दिशेने मार्गक्रमण करण्यास कटिबद्ध आहोत,'' असा इशारा दिला.

"कारभारामधील पारदर्शकते'च्या मुद्यावरुन भाजप व शिवसेनेमध्ये मतभेद असल्याचे गेल्या काही दिवसांमध्ये दिसून आले होते. या पार्श्‍वभूमीवर, मुख्यमंत्र्यांनी पारदर्शकतेच्या मुद्यावरुनच पुन्हा एकदा शिवसेनेस इशारा दिल्याचे मानले जात आहे.

बीएमसीची निवडणूक येत्या 21 फेब्रुवारी घेतली जाणार आहे. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरामधील महानगरपालिकेवरील सत्ता अर्थातच अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या पार्श्‍वभूमीवर, युती तोडण्याचा शिवसेनेचा हा निर्णय अत्यंत संवेदनशील मानल जात आहे. 

Web Title: Change will happen irrespective of who’s with BJP ,says Fadnavis