राज्यातील जलपर्यटन विस्तारणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

मुंबई ते गोवा जलपर्यटनानंतर गणपतीपुळे येथे पर्यटकांचा क्रुझमधून प्रवास सुरू झाला आहे.

 
मुंबई : मुंबई ते गोवा जलपर्यटनानंतर गणपतीपुळे येथे पर्यटकांचा क्रुझमधून प्रवास सुरू झाला आहे. पुढील वर्षभरात तारकर्ली, मुरुड जंजिरा; तर गुजरातमध्ये पोरबंदर, दीव, दमण, द्वारका येथे जलपर्यटन सुरू करण्यात येणार आहे. देशांतर्गत जलपर्यटनासाठी महाराष्ट्र, केरळ, गुजरात या राज्यांत नवीन बंदरांचा विकास करण्यात येत आहे. त्यामुळे देशांतर्गत जलपर्यटनाला चालना मिळणार आहे. यावर्षी 106 जहाजांनी मुंबईला भेट दिली. पुढील वर्षी मुंबई बंदरात 259 जहाजे येतील. त्यातून एक लाख 81 हजार प्रवासी प्रवास करतील, असा विश्‍वास मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी व्यक्त केला. 

मुंबई-मालदिव-मुंबई कोस्टा विक्‍टोरिया या भारतातील पहिले होमपोर्टिंग जहाजाचा प्रारंभ करण्यासाठी केंद्रीय जलवाहतूक मंत्री मनसुख मांडविया यांनी मुंबई येथे विक्‍टोरिया क्रुझला भेट दिली. त्यावेळी संजय भाटियाही उपस्थित होते, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी कोस्टा क्रुझ भारताच्या प्रतिनिधी नलिनी गुप्ता उपस्थित होत्या. 
लवकरच मुंबई ते पोरबंदर येथेही क्रुझ सेवा सुरू करण्यात येणार असून कर्णिका क्रुझ तेथे सफर करेल. त्याचे काम सध्या सुरू आहे; तसेच देशांतर्गत जलपर्यटन विकसित करण्यासाठी नवीन क्रुझ कंपन्यांशी चर्चा सुरू आहे, असेही ते म्हणाले. 

जलपर्यटन वाढवण्यावर सरकारचा भर असून जलपर्यटनाला भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी सरकारने मुंबई ट्रस्टमधील गौतम डे यांची केंद्रीय स्तरावर नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. जलपर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही विविध सवलती, सुविधा उपलब्ध करुन दिल्या असून यातून जलपर्यटनामध्ये मोठी वाढ होणार आहे, असे भाटिया म्हणाले. कोचिन, चेन्नई, नवीन मेंगलोर, मोर्मुगाव या बंदारापेक्षा मुंबईमध्ये सर्वाधिक जहाजे थांबली व त्यातून 86 हजार 757 पर्यटकांनी भेट दिली. 

----------------------- 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cruise in the state will expand