'युतीसाठी अजूनही वेळ गेलेली नाही'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

मुंबई - छोटा भाऊ म्हणून मनसे युतीसाठी तयार आहे, अजूनही वेळ गेलेली नाही, शिवसेनेने युतीच्या प्रस्तावाचा विचार करावा, अशा भावना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केल्या. मुंबईच्या हितासाठी दोन्ही भावांनी एकत्र यावे, अशी आपली इच्छा असल्याचेही नांदगावकरांनी सांगितले. 

मुंबई - छोटा भाऊ म्हणून मनसे युतीसाठी तयार आहे, अजूनही वेळ गेलेली नाही, शिवसेनेने युतीच्या प्रस्तावाचा विचार करावा, अशा भावना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केल्या. मुंबईच्या हितासाठी दोन्ही भावांनी एकत्र यावे, अशी आपली इच्छा असल्याचेही नांदगावकरांनी सांगितले. 

महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना - भाजपची युती तुटल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने युतीचा प्रस्ताव शिवसेनेकडे ठेवला. यासाठी बाळा नांदगावकर यांनी काल रात्री मातोश्रीवर शिवसेना नेत्यांशी चर्चा केली. आज मात्र शिवसेना प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेचा प्रस्ताव फेटाळला. या वेळी बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले, मराठी माणसांसाठी दोन भावांनी एकत्र यावे, अशी आपली इच्छा आहे. मुंबईचा विकास व्हावा यासाठी आपण करत असलेला हा प्रामाणिक प्रयत्न आहे. मनसेकडून युतीसाठी कुठलीही अट नव्हती. आम्हाला या ठिकाणी मदत करा, या जागा सोडा, अशी कुठलीही मागणी नव्हती. लहान भाऊ म्हणून ज्या जागा द्याल, त्या मान्य असतील, असा प्रस्ताव दिल्याचे नांदगावकर म्हणाले. मुंबईच्या हितासाठी दोघांनी एकत्र यावे, अशी आपली इच्छा आहे. राष्ट्रीय पक्षांना राज्याच्या अस्मितेबाबत काहीही पडलेलं नाही. मात्र, मराठी माणसांनी, हक्काच्या माणसांनी एकत्र यावे, अशी आपली भावना असल्याचे नांदगावकरांनी स्पष्ट केले. मला कोणतीही प्रसिद्धी नको होती, हे कुटुंबातले प्रकरण होते. प्रसारमाध्यमांना सांगायचे असते तर ढोल बडवत गेलो असतो, असेही नांदगावकर म्हणाले. 

युती झाली असती तर शिवसेनेलाच फायदा झाला असता, असे आपले ठाम मत असल्याचे बाळा नांदगावकर यांनी सांगितले. राज यांनी मातोश्रीवर सात वेळा फोन केले, तीन वेळा तर माझ्या समोरच केले. राज ठाकरेंची भावना मला समजली, त्यामुळे मी युतीचा प्रस्ताव घेऊन मातोश्रीवर गेलो. मात्र, अजूनही वेळ गेलेली नाही, शिवसेना विचार करू शकते, असे आवाहनही नांदगावकर यांनी केले. 

..तर राज ठाकरे मातोश्रीवर गेले असते 
राज ठाकरे स्वतः फोन करत होते, म्हणजे वेळ पडल्यास राजसाहेब मातोश्रीवर गेले असते, अशी खात्री बाळा नांदगावकरांनी व्यक्त केली. मनसेची परिस्थिती आणखी काय वाईट होणार, अशी कळकळ व्यक्त करतानाच मुंबईच्या हितासाठी दोन पावले मागे जाण्यास मनसे तयार असल्याचेही नांदगावकरांनी स्पष्ट केले. लहान भाऊ म्हणून मनसे शिवसेनेसोबत युती करण्यासाठी तयार आहे. आमच्या प्रस्तावाचा सन्मान राखा, त्याबाबत विचार करा, अशी मागणी शिवसेनेच्या नेत्यांकडे केल्याचे नांदगावकरांनी सांगितले. मात्र, उद्धव ठाकरे जर कोणताच प्रस्ताव आला नसल्याचे सांगत असतील, तर मीच खोटे बोलत असेन, असे नांदगावकर म्हणाले.

Web Title: Do not have time for the Alliance