भाजपच्या कार्यक्रमात मानापमान नाट्य

भाजपच्या कार्यक्रमात मानापमान नाट्य

ठाणे:  "पार्टी विथ डिफरन्स' अशी शेखी मिरवणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या ठाण्यातील गडकरी रंगायतनमधील कार्यक्रमात रविवारी मानापमान नाट्य पाहावयास मिळाले. नुकतेच भाजपवासी झालेले नवी मुंबईचे नेते ठाण्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांचा भाजपच्या ठाण्यातील पहिल्याच कार्यक्रमात अपमान झाल्याचे दिसून आले. त्याचबरोबर माजी खासदार भाजपचे ठाणे जिल्हा प्रभारी किरीट सोमय्या यांनीही व्यासपीठाऐवजी थेट सभागृहातील व्हरांड्यातच बसल्याने, तो चर्चेचा विषय ठरला. 

केंद्र सरकारने जम्मू-काश्‍मीरमधील कलम 370 रद्द केल्याबाबतची सविस्तर माहिती देण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्या जाहीर भाषणाचा कार्यक्रम रविवारी सायंकाळी ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये आयोजित करण्यात आला होता. या वेळी हे मानापमान नाट्य रंगले. सूत्रसंचालन करणाऱ्या निवेदकाने गणेश नाईक यांचा आज वाढदिवस असल्याने ते पुढील कार्यक्रासाठी निघून गेल्याचे वरवर सांगितले; तर अनेक विनवण्या करूनही सोमय्या व्यासपीठावर येत नसल्याचे पाहून चक्क "शो मस्ट गो ऑन' म्हणत कार्यक्रम पुढे रेटला. त्यामुळे भाजपमध्ये आयाराम आणि प्रस्थापित अशा गटबाजीची नांदी झाल्याचे दिसून आले.

दरम्यान, यासंदर्भात भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अधिक भाष्य करणे टाळले. याप्रसंगी, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार विनय सहस्त्रबुद्धे, भिवंडीचे खासदार कपिल पाटील, राष्ट्रीय संघटन मंत्री व्ही. सतीश, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे आदींसह अनेक पदाधिकारी व्यासपीठावर बसले होते. मात्र, कार्यक्रमाची धुरा सांभाळणारे माजी खा. किरीट सोमय्या आणि माजी मंत्री गणेश नाईक यांना व्यासपीठावर स्थान न देता प्रेक्षकांमध्ये असणाऱ्या पहिल्या रांगेत बसवण्यात आले होते. याच रागातून गणेश नाईक यांनी थेट सभागृहातून काढता पाय घेतला. तर,सोमय्या यांनी देखील सभागृहात मोकळ्या व्हरांड्यात बसकण मारल्याने या मानापमान नाट्याची चांगलीच चर्चा सभागृहात रंगली होती. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com