मोदींचे आवाहन, मतदारांमध्ये मात्र निरुत्साह 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

मतदान करणे हे लोकशाहीतील मोठे कर्तव्य आणि हक्‍क आहे.

नवी दिल्ली : राज्यात आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. राज्यातील 3,237 मतदारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील जनतेला मोठ्या प्रमाणात आवाहन करूनही राज्यातील जनतेमध्ये मतदान करण्याबाबत अतिशय निरुत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत केवळ 43 टक्‍के मतदारांनी मतदान केले आहे.

राज्यभर सुरू असलेला मुसळधार पाउस, जोडून आलेल्या सुट्यांमुळे पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकांमुळे मतदानाला या वेळी ओहोटी लागल्याचे दिसून येत आहे. मुसळधार पावसामुळे लोकांना मतदानासाठी बाहेर काढणे राजकीय पक्षांसमोर मोठे आव्हान आहे. प्रत्येक नेत्याकडून, जबाबदार नागरिकांकडून मतदान हा आपला हक्‍क आणि ते आपले कर्तव्य असल्याचे संदेश पसरवत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. निवडणूक आयोगानेही यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यानंतरही लोकांमध्ये मतदानासाठी निरुत्साह दिसून येत आहे.

आज महाराष्ट्राची जनता पुढील पाच वर्षे कोणाला सरकार चालविण्याची संधी द्यायची हे ठरविणार आहे. तेव्हा महाराष्ट्रातील माझ्या सर्व बंधू-भगिनी, तरुण मित्रांना माझे आवाहन आहे की, आज विक्रमी संख्येने मतदान करून लोकशाहीचा हा उत्सव समृद्ध करावा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. मात्र त्यांच्या आवाहनालाही तितकासा प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे. 

लोकशाहीचा अधिकारच माहिती नाही 
मतदान करणे हे लोकशाहीतील मोठे कर्तव्य आणि हक्‍क आहे. मतदानाच्या माध्यमातून आपला विकास करणारा प्रतिनिधी आपण निवडू शकतो. मात्र लोकांमध्ये याबाबत पुरेशी जागृतीच नसल्याने घरातून बाहेर पडण्याची नकारात्मक मानसिकता अनेक ठिकाणी दिसून येत आहे. राज्यातील अनेक ठिकाणी वयोवृद्ध जनता, अपंग नागरिक मतदान करत असताना अनेक तरुण मात्र फक्‍त समाजमाध्यमांवर लोकशाहीच्या गप्पा ठोकताना दिसून आहेत.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modi's appeal, however, discourages voters