राणीचा साज भंगारात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

नेरळ - नेरळ - माथेरान मिनी ट्रेन मार्गाला ११० वर्षे पूर्ण होत असताना या मार्गावर एअर ब्रेक प्रणालीचे नवे इंजिन, डबे चालवण्यासाठी चाचणी सुरू आहे. ही सज्जता सुरू असताना माथेरान राणीचा जुना साज अर्थात जुनी इंजिने व प्रवासी डबे भंगारात काढण्यासाठी नेरळ शेडबाहेर काढली आहेत. 

जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेला हा नॅरोगेज मार्ग सध्या सुरक्षिततेच्या कारणाने बंद आहे. या मार्गाची युद्धपातळीवर दुरुस्ती सुरू आहे. वर्षभरात मिनी ट्रेनसाठी तीन नवीन इंजिने आणण्यात आली आहेत. मे २०१६ मध्ये प्रवासी डबे घसरल्याने नेरळ - माथेरान व माथेरान - अमन लॉज शटल सेवा बेमुदत बंद ठेवण्यात आली आहे.जानेवारी २०१६ मध्ये मिनी ट्रेनसाठी आलेल्या नव्या इंजिनाची चाचणी नेरळ - माथेरानदरम्यान घेण्यात आली. ती चाचणी यशस्वी झाल्याने आणखी दोन इंजिने बनविण्याचे काम मुंबईतील (परळ) रेल्वे कारखान्यात सुरू झाले. ही दोन्ही इंजिने नेरळ लोको येथे आली आहेत. याच वेळी नेरळ लोको शेडमधील अतिरिक्त साहित्य बाहेर काढले जात आहे. त्यात मिनी ट्रेनच्या ताफ्यातील ३० वर्षे जुने प्रवासी डबे व आता वाहतुकीस योग्य नसलेली दोन इंजिने आहेत. यापूर्वी वापरात नसलेले आठ प्रवासी डबे नेरळ येथून रस्ता मार्गाने बाहेर नेण्यात आले आहेत. आता आणखी आठ जुने डबे नेले जात आहेत. ते ‘लोको’मधून बाहेर काढून वॅगनमध्ये भरण्यात आले आहेत.

माथेरान मिनी ट्रेनची जुनी इंजिने तसेच जुने प्रवासी डबे भंगारात काढले जाणार आहेत. याचा या सेवेवर तसा काही परिणाम होणार नाही. काही महिन्यांनी पुन्हा ही ट्रेन रुळावर येईल. 

-एस. एस. के. वर्मा, सहायक अभियंताल कोच विभाग, नेरळ लोको

Web Title: Neral-Matheran train