भाजपचे लक्ष्य आता विधानसभा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

सातारा - नगरपालिका आणि त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात पाय रोवले आहेत. केवळ पाय रोवले नाहीत, हा पक्ष कॉंग्रेसच्या बरोबरीने दुसऱ्या क्रमांकावर जाऊन बसला आहे. सलगच्या यशामुळे भाजपच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. आता पुढचे लक्ष विधानसभा निवडणूक असून, एकतरी आमदार घ्यायचाच या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. 

सातारा - नगरपालिका आणि त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात पाय रोवले आहेत. केवळ पाय रोवले नाहीत, हा पक्ष कॉंग्रेसच्या बरोबरीने दुसऱ्या क्रमांकावर जाऊन बसला आहे. सलगच्या यशामुळे भाजपच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. आता पुढचे लक्ष विधानसभा निवडणूक असून, एकतरी आमदार घ्यायचाच या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. 

साताऱ्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे दोन पक्ष सत्तेपासून नेहमीच दूर राहिले. त्यातूनच शिवसेनेने जिल्ह्याला एक खासदार व दोन आमदार दिले आहेत. सध्या पाटणमध्ये शंभूराज देसाई हे शिवसेनेचे एकमेव आमदार आहेत. पालकमंत्री विजय शिवतारे हे शिवसेनेचे आहेत. तसे जिल्ह्यातील काही तालुके हे शिवसेनेचे एकेकाळी बालेकिल्ले होते. या उलट परिस्थिती भाजपची होती. मुळात प्रत्येक तालुक्‍यात भाजपचे पदाधिकारी असूनही संघटनात्मक बळकटीकरण फारसे झाले नव्हते. विरोध म्हणून प्रत्येक निवडणुकीत त्यांचा उमेदवार असायचाच; पण यश मिळत नव्हते. केंद्रात, राज्यात सत्ता बदल झाला आणि पश्‍चिम महाराष्ट्राकडे भाजपच्या नेत्यांनी लक्ष केंद्रित केले. कोल्हापूरचे पालकमंत्री व महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी पालिका निवडणुकीपासून सातारा जिल्ह्यात लक्ष घातले. पालिका निवडणुकीत त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी करून आठ पालिकांत एकूण 18 नगरसेवक निवडून आणले. पहिल्यांदाच भाजपला इतके यश मिळाले. या यशातून बोध घेऊन चंद्रकांत दादांनी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी व्यूहरचना केली. यासाठी त्यांनी राष्ट्रवादीतील नाराजांना आपल्या गोटात घेतले. त्यामुळे कॉंग्रेसच्या हाती काहीही लागले नाही. बहुतांशी ठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या नंतर दुसऱ्या क्रमांकाची मते भाजपच्या उमेदवाराने घेतली. जिल्हा परिषदेत सात, तर पंचायत समित्यांत दहा जागा मिळाल्या. काही जागांवर त्यांचा निसटता पराभव झाला. या दोन निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने जिल्ह्यात पाय रोवले आहेत. आता भाजपच्या नेत्यांचे लक्ष विधानसभा निवडणूक असून, त्यादृष्टीने त्यांनी आतापासूनच कामाला सुरवात केली आहे. अजून दोन ते अडीच वर्षे अवकाश असला, तरी भारतीय जनता पक्षाने आतापासूनच तयारी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आगामी काळात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यात केंद्र व राज्यांतून विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून हे सर्व प्रत्यक्षात उरणार आहे. 

""जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अपेक्षेपेक्षा जास्त यश पक्षाला मिळाले आहे. त्यामुळे आम्ही सर्व तालुक्‍यांत विकासकामे करण्यावर भर देणार आहोत, तसेच आगामी विधानसभा निवडणूक हेच आमचे लक्ष्य असेल. किमान एक तरी आमदार आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत.'' 
- विक्रम पावसकर, जिल्हाध्यक्ष, भाजप 

Web Title: BJP now target assembly