शहरातील २५ ठिकाणी राहणार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

सोलापूर - महापालिका निवडणूक लढविणाऱ्या उमेदवार किंवा राजकीय पक्षाकडून बाहुबलाचा तसेच आर्थिक गैरव्यवहार होऊ नये यासाठी शहरातील २५ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. पोलिस आयुक्त कार्यालयाने संभाव्य संवेदनशील जागांची यादी महापालिका प्रशासनाकडे दिली आहे. 

सोलापूर - महापालिका निवडणूक लढविणाऱ्या उमेदवार किंवा राजकीय पक्षाकडून बाहुबलाचा तसेच आर्थिक गैरव्यवहार होऊ नये यासाठी शहरातील २५ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. पोलिस आयुक्त कार्यालयाने संभाव्य संवेदनशील जागांची यादी महापालिका प्रशासनाकडे दिली आहे. 

मतदानाच्या दिवशी किंवा त्या अगोदर काही प्रभागामध्ये बाहुबल किंवा आर्थिक गैरप्रकार होण्याची शक्‍यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर हे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. संबंधित प्रभागातील संवेदनशील परिसर, मतदान केंद्रांच्या परिसरातही कॅमेरे लावले जातील. सध्या शहरामध्ये सर्वाधिक संवेदनशील परिसर म्हणून प्रभाग सातची नोंद पोलिस विभागाकडे झाली आहे. त्यानुसार या संपूर्ण प्रभागाच्या परिसराची पाहणी करून कॅमेरे लावण्याच्या जागा निश्‍चित करण्यात आल्या आहेत. त्याच धर्तीवर शहरातील विविध भागांची पाहणी करून जागा निश्‍चित केल्या आहेत.

पोलिस विभागाने दिलेल्या यादीनुसार कॅमेरे लावण्यात येणारी स्थळे ः विजापूर वेस,  किडवाई चौक, घरकुल पोलिस चौकी, नई जिंदगी चौक, महापालिका शाळा क्रमांक एकवीससमोरील अंबिका चौक, जोडभागी पेठ पोलिस चौकीच्या डाव्या बाजूस बोगा पान शॉप चौक घोंगडे वस्ती, मौलाली चौक, अलकुंटे चौक, प्रतापनगर, गरिबी हटाओ झोपडपट्टी क्रमांक दोन, उत्कर्षनगर कोळी वसाहत, साईबाबा चौक, न्यू हायस्कूल परिसर, सलगरवाडी, नवजवान गल्ली, पंजाब तालीम मशिद, गवंडी गल्ली, पांजरापोळ चौक, शरदचंद्र पवार प्रशाला रस्ता, मंगळवेढा तालीम, सळई मारुती, चौपाड शाळा क्रमांक नऊसमोर, बाबाकादीर मशिद, बाळीवेस चौक, निराळे वस्ती, पत्रा तालीम, काळी मशिद व सळई मारुती चौक.

कॉप’ यंत्रणा कागदावरच 
निवडणुकीत चालणारे गैरप्रकार जागरूक नागरिकांना त्वरित कळविता यावे यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ‘कॉप-सिटीझन ऑन पेट्रोल’ हे ॲप विकसित केले होते. मात्र, मतदानाला आठ दिवस शिल्लक राहिले असतानाही अद्याप ते कार्यान्वित झाले नाही. हे ॲप सुरू करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडे ई-मेलद्वारे पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली.

Web Title: CCTV cameras will be monitored in 25 places